टी-20 वर्ल्डकप यूएईमध्ये शक्य | पुढारी | पुढारी

टी-20 वर्ल्डकप यूएईमध्ये शक्य | पुढारी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

भारतात यावर्षी आयोजित करण्यात येेणार्‍या टी-20 वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेवर कोरोना महामारीचे संकट घोंगावू लागले आहे. या महामारीमुळे भारतात वर्ल्डकप स्पर्धा आयोजित करणे अत्यंत अवघड आहे. अशा स्थितीत ही स्पर्धा संयुक्‍त अरब अमिरातमध्ये शिफ्ट केली जाऊ शकते, असे बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी शनिवारी सांगितले. 

एका वृत्तसंस्थेशी बोलताना जय शहा यांनी, टी-20 वर्ल्डकप स्पर्धा संयुक्‍त अरब अमिरातमध्ये शिफ्ट केली जाऊ शकते. असे असले तरी आम्ही देशातील कोरोना स्थितीवर नजर ठेवून आहोत. मात्र, आमच्यासाठी खेळाडूंची सुरक्षा आणि त्यांचे आरोग्य अत्यंत महत्त्वाचे आहे. यामुळे या स्पर्धेच्या आयोजनाबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असेही स्पष्ट केले आहे.

दरम्यान, ‘क्रिकइन्फो’ने दिलेल्या माहितीनुसार, या वर्षातील आयपीएलचे उर्वरित सामने आणि टी -20 वर्ल्डकप या दोन्ही स्पर्धा संयुक्‍त अरब अमिरातमध्ये आयोजित केल्या जाऊ शकतात. उर्वरित आयपीएल 19 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर यादरम्यान, तर टी-20 स्पर्धा 17 ऑक्टोबरपासून आयोजित केली जाऊ शकते. या स्पर्धेचा अंतिम सामना 14 नोव्हेंबर रोजी आयोजित केला जाऊ शकतो. 

टी-20 वर्ल्डकपचा संभाव्य कार्यक्रम

संभाव्य कार्यक्रमानुसार टी-20 वल्डर्र्कपच्या पहिल्या फेरीत आठ संघांची दोन गटांत विभागणी केली जाईल. यामध्ये एकूण 12 सामने होतील. यामधील प्रत्येक गटातील दोन आघाडीचे संघ सुपर-12 साठी पात्र ठरतील. सुपर-12 मधील अन्य संघांत बांगला देश, श्रीलंका, आयर्लंड, नेदरलँड, स्कॉटलंड, नामिबिया, ओमान आणि पापुआ न्यूगिनी यांचा समावेश आहे. या फेरीतील सामने संयुक्‍त अरब अमिरात आणि ओमानमध्ये होऊ शकतात. 

सुपर-12 मध्ये 30 सामने

सुपर-12 च्या फेरीला 24 ऑक्टोबरपासून सुरुवात होईल.  संघांना दोन गटांत विभागण्यात येईल. या गटात एकूण 30 सामने होतील आणि ते दुबई, अबुधाबी आणि शारजाह येथे आयोजित करण्यात येतील. या फेरीतील चार अव्वल आणि आयसीसी वर्ल्ड रँकिंगमधील अव्वल आठ संघ मुख्य फेरीत खेळतील. यामध्ये तीन प्लेऑफ आणि दोन सेमिफायनल व एक फायनल होईल.

उर्वरित आयपीएल यूएईमध्ये

कोरोना महामारीमुळे आयपीएल स्पर्धा गेल्या 4 मे रोजी स्थगित करण्यात आली होती. अद्याप 31 सामने बाकी आहेत. हे सामने सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये संयुक्‍त अरब अमिरातमध्ये आयोजित करण्यात येण्याची शक्यता आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत भारतात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता व्यक्‍त करण्यात येत आहे. यामुळे देशात उर्वरित आयपीएल आणि टी-20 वर्ल्डकप आयोजित करणे अत्यंत अवघड आहे. यामुळे या दोन्ही स्पर्धा आता संयुक्‍त अरब अमिरातमध्ये आयोजित करण्याचा विचार बीसीसीआय करत आहे. याबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे.

Back to top button