IPL 2022 : ईशानची प्रत्येक धाव ठरली पावणेपाच लाखांची | पुढारी

IPL 2022 : ईशानची प्रत्येक धाव ठरली पावणेपाच लाखांची

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : आयपीएल 2022 (IPL 2022) साठीच्या लिलावात युवा यष्टिरक्षक, फलंदाज ईशान किशनसाठीची 15.25 कोटी रुपयांची विक्रमी बोली माजी विजेता मुंबई इंडियन्ससाठी तोट्याची ठरली आहे. 11 सामन्यांमधील 321 धावा पाहता फ्रँचायझीने त्याच्या प्रत्येक धावेसाठी 4.75 म्हणजे पावणेपाच लाख रुपये मोजले आहेत.

यंदाच्या आयपीएल लिलावात 2018 ते 2021 या कालावधीत मुंबईचे प्रतिनिधित्व करणार्‍या ईशानसाठी कितीही रक्कम मोजण्याची तयारी आकाश अंबानी यांनी केली होती.मात्र, त्यांना ईशानचा सौदा फारच महागात पडला.

पहिल्या दोन सामन्यांत नाबाद 81 आणि 53 धावा काढताना 23 वर्षीय किशनने 15व्या हंगामाची आश्वासक सुरुवात केली तरी त्याला सातत्य राखता आले नाही. नाही म्हणायला ईशानने 11 इनिंग्जमध्ये तीनदा अर्धशतकी मजल मारली आहे. मात्र, उर्वरित 8 डावांमध्ये त्याची सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्या 26 इतकी आहे. (IPL 2022)

डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवरील कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धचा सोमवारचा पराभव माजी विजेत्या मुंबईचा 11 सामन्यांतील नववा पराभव ठरला. पराभवाचे खापर कुणा एकावर फोडता येत नसले तरी ईशानची कामगिरी त्याच्या किमतीला साजेेशी नक्कीच नाही. कोलकाताविरुद्ध त्याने सर्वाधिक 51 धावा केल्या; पण 43 चेंडू खर्ची घातले आणि मोक्याच्या क्षणी तोही बाद झाला.

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माकडूनही मालकांना 16 कोटी रुपये मोजूनही तोटाच झाला. 11 सामन्यांनंतरही त्याला एकही अर्धशतक मारता आले नाही. त्याची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या 43 आहे. आता 11 डावांतील 200 धावा म्हणजे रोहितच्या प्रत्येक धाव अंबानींना 8 लाख रुपयांना पडली.

Back to top button