भारतीय संघात दिनेश कार्तिक याला संधी शक्य? | पुढारी

भारतीय संघात दिनेश कार्तिक याला संधी शक्य?

मुंबई ; वृत्तसंस्था : क्रिकेट जगतात सध्या आयपीएल-2022 ची धूम आहे. कोट्यवधी चाहत्यांचे लक्ष या लीगवर असले तरी सर्वांची नजर ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियात होणार्‍या टी-20 वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेवर आहे. तत्पूर्वी भारतीय संघाला अनेक महत्त्वाच्या मालिका खेळावयाच्या आहेत. यामुळे आयपीएलनंतर टीम इंडिया पूर्ण अ‍ॅक्शनमध्ये परतणार आहे.

आयपीएलनंतर लागलीच भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाच सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेत भारतीय संघात टी-20 वर्ल्डकपचे अनेक दावेदार खेळाडू खेळताना दिसतील. यामध्ये दिनेश कार्तिकचाही समावेश असेल. आरसीबीच्या या फलंदाजाने फिनिशरची भूमिका पार पाडताना संघाला विजय मिळवून दिले. यामुळेच तीन वर्षांनंतर दिनेश कार्तिक पुन्हा एकदा टीम इंडियाकडून खेळताना दिसू शकतो, असे म्हटले जात आहे.

दिनेश कार्तिकने यापूर्वी आपला शेवटचा सामना 2019 मध्ये झालेल्या वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेत न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता. या सामन्यात स्वीकाराव्या लागलेल्या पराभवाने दिनेशने टीम इंडियातील आपले स्थान गमावले होते. त्यानंतर पुन्हा त्याच्या नावाचा विचारच झाला नव्हता. यामुळे त्याने समालोचन करण्यास सुरुवात केली होती.

दरम्यान, आरसीबीने 2022 च्या मेगाऑक्शनमध्ये कार्तिकवर डाव खेळला. स्पर्धेत आता हा फलंदाज फिनिशरची भूमिका पार पाडून संघाला विजय मिळवून देत आहे. यामुळे निवड समितीही खूश झाली आहे. यामुळेच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार्‍या टी-20 मालिकेत त्याच्या नावाचा विचार होण्याची शक्यता आहे.

बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी दिनेश कार्तिक संघात प्रवेश करण्याचा मुख्य दावेदार आहे. जे खेळाडू चांगले प्रदर्शन करतात त्यांच्यासाठी टीम इंडियाचे दरवाजे खुले असतात. दरम्यान, टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री आणि माजी कर्णधार सुनील गावसकर यांनीही कार्तिकला टीम इंडियात संधी द्यावी, अशी मागणी केली आहे.

Back to top button