शेवटच्या २० सेकंदात दीपक पुनियाचा ब्रांझ मेडलच्या लढतीत पराभव

टोकियो; पुढारी ऑनलाईन : भारतीय कुस्तीपटू दीपक पुनियाला (८६ किलो वजनी गट) टोकियो २०२० च्या कांस्य पदकाच्या कुस्ती सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. शेवटच्या २० सेकंदात हा सामना फिरला. सॅन मारिनोचा पैलवान नाझम मायलेस अमाईन विरुद्ध २ गुण गमावून दिपकला कांस्यपदकापासून दूर रहावं लागलं आहे. नाझमने दिपकविरुद्धचा हा सामना ४-३ गुणांनी जिंकला. तो कांस्यपदकाचा विजेता ठरला.

दरम्यान, पैलवान नाझमच्या अखेरच्या डावाविरुद्ध भारताने आव्हान दिले. पण पंचांनी ते फेटाळले. तसेच पंचांनी नाझमला आणखी एक गुण बहाल केला. यामुळे गुणसंख्या ४-२ झाली.

तत्पूर्वी दीपक पुनियाने मॅकुहारी मेस्से हॉलच्या मॅटवर सामन्याच्या पहिल्या हापमध्ये २-१ अशी आघाडी घेतली. यानंतर, दुसऱ्या हाफच्या लढतीत ही आघाडी कायम राखली. पण अवघ्या २० सेकंदांचा खेळ शिल्लक असताना सॅन मारिनोच्या पैलवानाने आक्रमक खेळ करून दीपकचा पाय पकडला. आणि मॅटवर खेचले. त्यामुळे नाझमला २ गुण मिळाले. त्यामुळे ही गुणसंख्या ३-२ वर पोहचली.

त्यानंतर भारताने पंचांच्या गुण देण्याच्या निर्णयावर आक्षेप घेत आव्हान केले. त्यानंतर पंचांनी अखेरच्या २० मिनिटातील सामन्याचे चित्रीकरण पुन्हा पाहिले आणि भारताचे आव्हान फेटाळून लावले. तर नाझमला आणखी १ गुण बहाल केला. त्यामुळे नाझमची गुणसंख्या ४ झाली. तर दिपक पुनियाचे २ गुण होते. त्यामुळे नाझमने हा अंतिम सामना ४ विरुद्ध २ गुणांनी जिंकला.

Back to top button