tokyo olympics 2020 wrestling : झुंझार रविकुमार दहियाला रौप्य पदक!

टोकियो; पुढारी ऑनलाईन : tokyo olympics 2020 wrestlingभारताला कुस्तीच्या आखाड्यातून सुवर्ण पदक मिळण्याची आशा संपुष्टात आली आहे. tokyo olympics 2020 मध्‍ये पैलवान रविकुमार दहियाचा ५७ किलो वजनी गटात पराभव झाला आहे.

अंतिम फेरीत दोन वेळा विश्वविजेता ठरलेल्या रशियाच्या जावूर युग्युयेव्हने त्याच्यावर ७-४ गुणांनी मात केली. पराभव झाला असला तरी त्याने झुंझार खेळाचे प्रदर्शन केले. त्यामुळे त्याचे सोशल मीडिया तसेच देशवासियांनी अभिनंदन केले आहे. ऑलिम्पिकमध्ये भारताच्या खात्यात आता २ रौप्य आणि ३ कांस्यपदके जमा झाली आहेत.

रवीकुमारने उपांत्य फेरीत कझाकिस्तानच्या सनायेव नुरिस्लामचा पराभव करून अंतिम फेरीत गाठली.

अंतिम फेरीत रवीचा युग्युयेवशी सामना होता. दोघेही उत्कृष्ट फॉर्ममध्ये होते.

यापूर्वी या दोघा कुस्तीपटूंचा सामना २०१९ च्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये झाला होता. त्या सामन्यात रशियन पैलवानाने भारतीय कुस्तीपटूला चुरशीच्या सामन्यात ६-४ ने पराभूत केले.

या स्पर्धेत रवीला कांस्यपदक मिळाले होते. रवीने २०२० आणि २०२१ आशियाई चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले. त्याचबरोबर त्याने २०१८ च्या अंडर-२३ चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक जिंकले हाेते.

रवी कुमार ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारा पाचवा भारतीय कुस्तीपटू…

रवी कुमार दहिया ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारा एकूण पाचवा भारतीय कुस्तीपटू आहे. खाशाबा जाधव यांनी हेलसिंकी ऑलिम्पिक (१९५२) मध्ये भारतासाठी पहिलं कांस्यपदक जिंकले. यानंतर कुस्तीपटू सुशील कुमारने भारतासाठी बीजिंग ऑलिम्पिक (२००८) मध्ये कांस्य आणि लंडन ऑलिम्पिक (२०१२) मध्ये रौप्यपदक पटकावले. सुशील व्यतिरिक्त योगेश्वर दत्त लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्य जिंकण्यात यशस्वी ठरला. तर महिला कुस्तीपटू साक्षी मलिकने २०१६ च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले.

युग्युयेव रशियाचा सर्वोत्तम कुस्तीपटू…

द्वितीय मानांकित युग्युवेने २०१८ आणि २०१९ चे जागतिक अजिंक्यपद पटकावले आहे. तो रशियाचा सर्वोत्तम कुस्तीपटूंपैकी आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत १५ आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये १४ पदके जिंकली आहेत. यापैकी १२ सुवर्णपदके आहेत. मात्र, टोकियो ऑलिम्पिकमध्ये त्याला काही कठीण सामन्यांना सामोरे जावे लागले. उपांत्य फेरीत त्याने इराणच्या रझा अत्रिनाघर्चीनीचा पराभव केला.

रवीने उपांत्य फेरीत शानदार विजय मिळवला…

दुसरीकडे, चौथ्या मानांकित रवी दहियाने उपांत्य फेरीत कझाकिस्तानच्या नुरिस्लामचा पराभव करून सामना जिंकला.

रवी उपांत्य फेरीत ८ गुणांनी पिछाडीवर होता. असं वाटत होतं की त्याचा सहज पराभव होणार पण १ मिनिट शिल्लक असताना रवीने कझाक कुस्तीपटूला चितपट करून आस्मान दाखवले.

पंचांनी फॉल रूलद्वारे रविला विजयी घोषित केले.

अधिक वाचा :

Back to top button