LSG vs KKR : लखनौची गरुडझेप..! ११ सामन्यांत आठ विजय | पुढारी

LSG vs KKR : लखनौची गरुडझेप..! ११ सामन्यांत आठ विजय

पुणे ; वृत्तसंस्था : लखनौ सुपर जायंटस्ने (LSG vs KKR) आयपीएलमध्ये पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे. त्यांनी शनिवारच्या लढतीत कोलकाताला अक्षरशः चिरडून 75 धावांनी महाकाय विजय संपादन केला. सरस धावगतीच्या आधारे गुजरातला दुसर्‍या क्रमांकावर ढकललेल्या लखनौने 11 सामन्यांत आठ विजय मिळवून 16 गुणांची कमाई केली आहे. जेसन होल्डर आणि आवेश खान यांच्या भेदक मार्‍यापुढे कोलकाताची भंबेरी उडाली. 14.3 षटकांत त्यांचा सर्व संघ 101 धावा करून तंबूत परतला.

विजयासाठी 177 धावांचा पाठलाग करणार्‍या कोलकाताची सुरुवात धक्कादायक झाली. मोहसीन खानने टाकलेल्या पहिल्या षटकात त्यांना एकही धाव करता आली नाही. उलट मोहसीनने बाबा इंद्रजितला शून्यावरच तंबूचा रस्ता दाखवला. पाठोपाठ सहा धावा करून कर्णधार श्रेयस अय्यरला दुष्मंता चमिराने आयुष बदोनीकरवी स्क्वेअर लेगला झेलबाद केले.

फलकावर तेव्हा 11 धावा लागल्या होत्या. अडखळत खेळणारा एरॉन फिंच याला जेसन होल्डरने यष्टीरक्षक क्विंटन डी कॉकमार्फत झेलबाद केले. फिंचने 14 धावा केल्या. या हंगामात फिंचला दारुण अपयश आले आहे. कोलकाताची करुण कहाणी यानंतरही संपली नाही. आता आवेश खानने नितीश राणा याला केवळ दोन धावांवर त्रिफळाबाद केले. फलकावर तेव्हा 25 धावा लागल्या होत्या.

आवेश खानने हे षटक निर्धाव टाकले. पहिल्याच षटकात मोहसीन खानने अशीच कमाल केली होती. रिंकू सिंग केवळ 6 धावा करून परतला. 13 षटकांचा खेळ संपला तेव्हा कोलकाताची अवस्था 7 बाद 88 अशी झाली होती. पाठोपाठ सुनील नारायण 22 धावा करून बाद झाला. जेसन होल्डरने त्याला तंबूचा रस्ता दाखवला. लगेच पुढच्या चेंडूवर होल्डरने टीम साऊथीला तंबूत पाठवून दिले. मग हर्षित राणा याला आयुष बदोनीने धावबाद केले व लखनौ संघाने जल्लोष केला. या पराभवामुळे कोलकाताचे 11 सामन्यांतून अवघे 8 गुण झाले आहेत. (LSG vs KKR)

शनिवारी त्यांना सातव्यांदा हार पत्करावी लागली. आतापर्यंत या चमूने चार विजय मिळवले आहेत. लखनौकडून आवेश खान आणि जेसन होल्डर यांनी प्रत्येकी तीन बळी मिळवून कोलकाताची भंबेरी उडवली. तसेच दुष्मंता चमिरा, रवी बिश्नोई आणि मोहसीन खान यांनी प्रत्येकी एक मोहरा टिपला.

त्यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यर याने नाणेेफेक जिंकून लखनौ सुपर जायंटस् संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. लखनौने 20 षटकांत 7 बाद 176 धावा उभारल्या. त्यांची सुुरुवात धक्कादायक झाली. कर्णधार लोकेश राहुल याला भोपळाही न फोडता तंबूत परतावे लागले. श्रेयस अय्यरने केलेल्या जबरदस्त थ्रोमुळे तो धावबाद झाला.

त्यानंतर क्विंटन डी कॉकने अर्धशतक ठोकले. आपल्या 50 धावांच्या खेळीत त्याने 29 चेंडूंचा सामना करताना 4 चौकार आणि 3 षटकार खेचले. दीपक हुड्डासोबत त्याने 71 धावांची भागीदारी केली. हुड्डानेही 41 धावांची चमकदार खेळी केली. मुख्य म्हणजे या जोडीने आणखी बळी जाणार नाहीत याची पुरेपूर दक्षता घेतली. हुड्डाने 27 चेंडूंचा सामना करताना 4 चौकार आणि दोन षटकार हाणले. मग कृणाल पंड्याने काहीशी संथ फलंदाजी केली. त्याने दोन चौकारांच्या मदतीने 25 धावांसाठी 27 चेंडू खर्च केले. (LSG vs KKR)

दरम्यान, जेसन होल्डरने 13 धावा केल्या त्या फक्त 4 चेंडूंत. टीम साऊथीच्या गोलंदाजीवर तो सीमारेषेपाशी झेल देऊन तंबूत परतला. साऊथीने शेवटच्या षटकात केवळ 4 धावा दिल्या. मार्कुस स्टॉयनिस आणि जेसन होल्डर यांनी जोरदार टोलेबाजी केल्यामुळे लखनौला 176 धावांपर्यंत मजल मारता आली. कोलकाताकडून आंद्रे रसेलने 2 तर टीम साऊथी, शिवम मावी आणि सुनील नारायण यांनी प्रत्येकी 1 मोहरा टिपला.

मावीला ठोकले 5 षटकार

मार्कुस स्टॉयनिसने सामन्यात बहार आणली. त्याने शिवम मावीच्या षटकात लागोपाठ तीन षटकार खेचले. पुढच्या चेंडूवर स्टॉयनिस बाद झाला. त्याने 14 चेंडूंत 28 धावा कुटल्या. पाठोपाठ जेसन होल्डराने मावीला लागोपाठ दोन षटकार खेचले. मावीच्या या षटकात एकूण पाच षटकार लगावले गेले. त्याने 30 धावा मोजल्या. सामन्यातील हे 19 वे षटक होते.

रसेल बाद व सामना फिरला

आंद्रे रसेल मैदानात उतरला आणि त्याने 19 चेंडूंत 45 धावांची बरसात केली. त्याच्या स्फोटक खेळीमुळे कोलकाता संघाच्या विजयाच्या आशा जागृत झाल्या. रसेलने 3 चौकार आणि 5 गगनचुंबी षटकार खेचून सामन्यात रंग भरला. अखेर आवेश खानला उंचावरून फटकावण्याचा मोह त्याला नडला आणि जेसन होल्डरने रसेलचा झेल टिपला. रसेल बाद झाला आणि तिथेच लखनौचा विजय व कोलकाताचा दारुण पराभव निश्चित झाला.

Back to top button