IPL 2022 KKR vs RR : कोलकाताने सात गडी राखून राजस्थानला दिला तडाखा | पुढारी

IPL 2022 KKR vs RR : कोलकाताने सात गडी राखून राजस्थानला दिला तडाखा

मुंबई; वृत्तसंस्था : नितीश राणा, कर्णधार श्रेयस अय्यर आणि रिंकू सिंग या त्रिकुटाने केलेल्या शानदार फलंदाजीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने (IPL 2022 KKR vs RR) सोमवारी राजस्थान रॉयल्स संघावर 7 गडी राखून सफाईदार विजय नोंदवला. त्यामुळे दहा सामन्यांतून कोलकाताचे आठ गुण, तर राजस्थानचे तेवढ्याच सामन्यांतून 12 गुण झाले आहेत. येथील वानखेडे स्टेडियमच्या खेळपट्टीवर फारशा धावाच होऊ शकत नव्हत्या. त्या अर्थाने हा सामना माफक धावांचा (लो स्कोअरिंग मॅच) ठरला.

विजयासाठी ठेवलेले 153 धावांचे लक्ष्य कोलकाताने (IPL 2022 KKR vs RR) तीन गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. त्यांनी 5 चेंडू बाकी असतानाच विजयाला गवसणी घातली. कोलकाताने 3 बाद 158 धावा टोलवल्या. त्यांचा सलामीवीर एरॉन फिंच याला कुलदीप सेनने त्रिफळाबाद केले. या हंगामात दयनीय प्रदर्शन करत असलेल्या फिंचने 7 चेंडूंत 4 धावा केल्या. दुसरा सलामीवीर बाबा इंद्रजित याने 15 धावा केलेल्या असताना प्रसिद्ध कृष्णाने त्याला तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरने 34 धावांची झकास खेळी केली. 32 चेंडूंचा सामना करताना त्याने 3 चौकार व एक षटकार खेचला. नितीश राणाने नाबाद 48 तर रिंकू सिंगने नाबाद 42 धावा चोपल्या. राजस्थानकडून ट्रेंट बोल्ट, कुलदीप सेन आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

त्यापूर्वी कोलकाताचा (IPL 2022 KKR vs RR) कर्णधार श्रेयस अय्यर याने नाणेफेक जिंकून राजस्थान रॉयल्सला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. राजस्थानचा सलामीवीर जोस बटलर यावेळी लवकर बाद झाला. 25 चेंडूंचा सामना करून त्याने 22 धावा केल्या. मात्र, नेहमीचा जोश त्याच्या खेळात दिसला नाही. टिम साऊथीने त्याला शिवम मावीकरवी झेलबाद केले. दुसरा सलामीवीर देवदत्त पडिक्कल हा तर अवघ्या 2 धावा करून तंबूत परतला. पाठोपाठ करुण नायर हाही 13 धावा केल्यावर बाद झाला. मात्र, कर्णधार संजू सॅमसनने एक बाजू लावून धरताना छान फलंदाजी केली. रियान परागने त्याला सुरेख साथ दिली. अर्थात, राजस्थानची धावगती सोळा षटकांचा खेळ होऊनही सातच्या आसपास होती. त्याचे श्रेय कोलकाताच्या अचूक मार्‍याकडे जाते. उमेश यादव आणि अनुकूल रॉय या दोघांनीही राजस्थानच्या फलंदाजांना जखडून ठेवले होते. दोघांनी आपल्या चार-चार षटकांत अनुक्रमे 24 आणि 28 धावा खर्च केल्या.

रियान पराग स्थिरावत आहे असे वाटत असतानाच त्याला साऊथीने तंबूत पाठवले. परागने 19 धावांची चटपटीत खेळी केली. शिवम मावीने संजू सॅमसनला रिंकू सिंगच्या हाती मिडविकेटला झेल द्यायला लावून राजस्थानला जबरदस्त हादरा दिला. त्यानंतर शिमरॉन हेटमायर आणि रविचंद्रन अश्‍विन ही जोडी मैदानात उतरली. सामन्यातील 19 व्या षटकात साऊथीने 20 धावा दिल्या. तसेच शेवटच्या षटकांत शिवम मावीने 10 धावा दिल्या. हेटमायरने 13 चेंडूंत नाबाद 27 धावा (एक चौकार आणि दोन षटकार) केल्या तर अश्‍विन 6 धावांवर नाबाद राहिला. कोलकाताकडून टिम साऊथीने दोन गडी टिपले. उमेश यादव, शिवम मावी आणि अनुकूल रॉय यांनी प्रत्येकी एक फलंदाज बाद केला.

बटलर बाद व धावांना खीळ

यंदाच्या आयपीएलमध्ये तीन शतके ठोकलेला सलामीवीर जोस बटलर लवकर बाद झाल्यामुळे राजस्थानच्या धावांना लगाम बसला. दुसरा सलामीवीर देवदत्त पडिक्कल हाही अपयशी ठरला. या दोघांकडून भक्कम पायाभरणी झाली नाही. शिवाय मधली फळीदेखील कोसळली. त्यामुळे राजस्थानला 152 धावांवर समाधान मानावे लागले. वानखेडेच्या खेळपट्टीनेही गोलंदाजांना चांगली साथ दिली.

वाईडसंदर्भात तिसर्‍या पंचांकडे दाद

या सामन्यात राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने कमाल केली. प्रसिद्ध कृष्णाचा एक चेंडू वाईड ठरवल्यानंतर सॅमसनने चक्क तिसर्‍या पंचांकडे दाद (रिव्ह्यू) मागितली. त्यामुळे सर्वजण अवाक् झाले. सहसा वाईडचा निर्णय मैदानावरील पंच देतात. काही दिवसांपूर्वी दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत याने अशाच एका वाईडच्या निर्णयावरून प्रचंड थयथयाट केला होता हे रसिकांना स्मरतच असेल.

Back to top button