RR vs MI : रोहितला वाढदिनाची भेट, नवव्या प्रयत्नात मुंबई यशस्वी! | पुढारी

RR vs MI : रोहितला वाढदिनाची भेट, नवव्या प्रयत्नात मुंबई यशस्वी!

मुंबई ; वृत्तसंस्था : लागोपाठ आठ पराभवांचा तडाखा सोसल्यानंतर अखेर नवव्या प्रयत्नात मुंबई इंडियन्सने (RR vs MI) यशाची न्यारी चव चाखली असून या विजयाद्वारे त्यांनी कर्णधार रोहित शर्माला वाढदिवसाची भेट दिली. डॅनियल सॅम्सने उत्तुंग षटकार खेचून मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

मुंबईने शनिवारी राजस्थान रॉयल्सला 5 गडी राखून नमवले. सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांनी केलेल्या संयमी फलंदाजीने मुंबईच्या विजयाचा रस्ता मोकळा केला. मुंबईने 5 गडी गमावून 161 धावा फटकावल्या. मुंबईच्या खात्यात आता नऊ सामन्यांतून दोन गुण जमा झाले आहेत. राजस्थानचे नऊ सामन्यांतून 12 गुण झाले आहेत.

विजयासाठी 159 धावांचे लक्ष्य समोर ठेवून उतरलेल्या मुंबईने कर्णधार रोहित शर्मा आणि ईशान किशन हे दोन्ही सलामीवीर लवकर गमावले. रोहितने तर फक्त दोन धावा करून तंबूचा रस्ता धरला. पाठोपाठ 26 धावांची उपयुक्त खेळी करून किशन बाद झाला. त्याने 18 चेंडूंचा सामना करताना 4 चौकार आणि 1 षटकार हाणला. त्याची फलंदाजी बहरेल असे वाटत असतानाच त्याला ट्रेंट बोल्टने टिपले.

रविचंद्रन अश्विनने रोहितला तंबूचा रस्ता दाखवला. सूर्यकुमार यादवने 51 तर तिलक वर्माने 35 धावांचे योगदान दिले. टिम डेव्हिडने मग कायरान पोलार्डच्या साथीत विजयाची औपचारिकता पूर्ण केली. त्याने धावांची उपयुक्त खेळी केली. राजस्थानकडून ट्रेंट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा, रविचंद्रन अश्विन, युजवेंद्र चहल आणि कुलदीप सेन यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. (RR vs MI)

त्यापूर्वी मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून राजस्थानला फलंदाजी दिली. जोस बटलर आणि देवदत्त पडिक्कल यांनी राजस्थानच्या डावाला सावध सुरुवात केली. पडिक्कलने 15 धावा केल्यानंतर तंबूचा रस्ता धरला. तसेच कर्णधार संजू सॅमसन हाही 16 धावा करून बाद झाला. त्याने 7 चेंडूंचा सामना करताना दोन षटकार खेचले.

पडिक्कलला ऋतिक शोकीनने आणि सॅमसनला कुमार कार्तिकेयने टिपले. कार्तिकेयचा हा आयपीएलमधील पहिलाच बळी ठरला. डॅरियल मिशेलने 17 धावा केल्या, पण त्यासाठी त्याने 20 चेंडू घेतले. त्याला डॅनियल सॅम्सने तंबूत पाठवले. भरवशाचा रियान पराग यालाही मोठी खेळी करता आली नाही. त्याने 2 धावा केल्या आणि त्याला रिले मेरेडिथने बाद केले. दरम्यान, 52 चेंडूंत 67 धावांची सुरेख खेळी करून जोस बटलर बाद झाला. त्याने 5 चौकार आणि 4 षटकार हाणले. त्याला शोकीनने टिपले.

बटलरच्या अप्रतिम फलंदाजीमुळेच राजस्थानला समाधानकारक धावसंख्या गाठता आली. शेवटच्या षटकात त्यांना अवघ्या तीन धावा करता आल्या. रविचंद्रन अश्विनने 9 चेंडूंत 21 धावा झोडल्या त्या 3 चौकार आणि एका षटकारासह. मुंबईकडून ऋतिक शोकीन आणि रिले मेरडिथ यांनी प्रत्येकी दोन तर डॅनियल सॅम्स आणि कुमार कार्तिकेय यांनी प्रत्येकी एक मोहरा टिपला.

Back to top button