आयपीएल 2022 : ‘या’ संघाने केली होती मुंबईपेक्षा खराब कामगिरी | पुढारी

आयपीएल 2022 : ‘या’ संघाने केली होती मुंबईपेक्षा खराब कामगिरी

मुंबई ; वृत्तसंस्था : तब्बल पाच वेळा अजिंक्यपदाचा चषक उंचावलेल्या मुंबई इंडियन्सची कामगिरी यंदाच्या (आयपीएल 2022) आयपीएलमध्ये दयनीय झाली असून रोहित शर्माच्या नेतृत्वातील मुंबईला यावेळी लागोपाठ आठ सामन्यांत हार स्वीकारावी लागली आहे. साहजिकच मुंबईचा संघ प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर फेकला गेला आहे. यंदाच्या हंगामात प्ले ऑफमधून बाहेर जाणारा मुंबई हा पहिलाच संघ होय. गुणतालिकेतही हा चमू तळाला आहे. अर्थात, या आधीदेखील एका संघाला 11 सामन्यांत पराभव स्वीकारावा लागला होता. मुंबईसाठी सध्याच्या स्थितीत हाच काय तो दिलासा!

लागोपाठ आठ सामने गमावल्यामुळे मुंबईच्या संघाला कडक टीकेला सामोरे जावे लागत आहे. चाहतेही निराश झाले आहेत. मात्र, अशी लाजिरवणी कामगिरी करणारा मुंबई हा पहिलाच संघ नव्हे. याआाधीही काही संघांनी निराशाजनक कामगिरी केली आहे. प्रत्येक हंगामात मुंबईला पहिले काही सामने गमावताना पाहायची चाहत्यांना सवय आहे.

मुंबईचा पहिला सामना देवाला… असेही चेष्टेने म्हटले जाते. आता मुंबईला दिलासा असा की, लागोपाठ सर्वाधिक सामने गमावण्याचा विक्रम कोलकाता नाईट रायडर्सच्या नावावर आहे. 2009 मध्ये कोलकाता संघाला लागोपाठ नऊ सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला होता. यादरम्यान एक सामना रद्द झाला होता.

2014 मध्ये दिल्ली कॅपिटल्स (त्यावेळची दिल्ली डेअर डेव्हिल्स) संघालाही लागोपाठ नऊ सामन्यांत पराभवाचे तोंड पाहावे लागले होते. पुणे वॉरियर्सचीही परिस्थिती काहीशी अशीच होती. पुणे संघालाही अशाच पराभवाचा सामना करावा लागला होता. पुणे संघाला 2012 मध्ये अखेरच्या नऊ सामन्यांत हार पत्करावी लागली होती. त्याशिवाय पुणे संघाने 2013 मधील सुरुवातीचे दोन सामने गमावले होते. त्यामुळे लागोपाठ 11 सामन्यांत पुणे संघाला हार पत्करावी लागली होती.

रोहित झालाय सुन्‍न (आयपीएल 2022)

यंदाच्या आयपीएलमध्ये संभाव्य विजेत्यांच्या यादीत मुंबई इंडियन्सचे नावही होते. मात्र, या संघाने एवढे सुमार प्रदर्शन केले की, चाहत्यांचा त्यावर आजही विश्‍वास बसायला तयार नाही. कर्णधार रोहित शर्माची अवस्था ‘शक्‍ती चालेना आणि युक्‍ती यशस्वी होईना’ अशी करुण झाली आहे. त्याची चिडचिड वाढत चालली आहे. सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदांतही अनेकदा याचा प्रत्यय आला आहे. मुंबई इंडियन्सच्या केविलवाण्या कामगिरीला लक्ष्य करून सोशल मीडियावर अनेक विनोदी प्रतिक्रिया व्यक्‍त केल्या जात आहेत.

Back to top button