शिखर धवन याने आयपीएलमध्ये गाठले यशाचे नवे ‘शिखर’ | पुढारी

शिखर धवन याने आयपीएलमध्ये गाठले यशाचे नवे ‘शिखर’

मुंबई ; वृत्तसंस्था : भारतीय क्रिकेटमधील ‘गब्बर’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या फलंदाज शिखर धवन याने एका नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. सोमवारी खेळल्या गेलेल्या पंजाब किंग्ज विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामन्यात पंजाबचा सलामीवीर या नात्याने खेळताना धवनने सुरुवातीला दोन धावा पूर्ण करून नवा विक्रम रचला. त्याने आयपीएलमधील 6000 धावांचा टप्पा पूर्ण केला असून, विशेष म्हणजे ही कामगिरी करणारा तो दुसराच फलंदाज आहे.

या सामन्यापूर्वी शिखर धवनने आतापर्यंत आयपीएलचे 201 सामने खेळले होते. ज्यात 34.67 च्या सरासरीने त्याने 5 हजार 998 धावा केल्या होत्या. यात दोन शतके आणि 45 अर्धशतकांचा समावेश होता. आयपीएलमध्ये तो सर्वाधिक धावा करणार्‍या फलंदाजांच्या यादीत विराटनंतर दुसर्‍या क्रमांकावर आहे.

विराटने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत 215 सामन्यांत 36.58 च्या सरासरीने 6 हजार 402 धावा केल्या आहेत. त्यानंतर रोहित शर्मा 5 हजार 764 धावांसह तिसर्‍या क्रमांकावर आहे. त्याने 221 सामन्यांत ही कामगिरी केली आहे.

सर्वाधिक चौकार धवनच्या नावे

शिखर धवन हा आयपीएलमध्ये सर्वाधिक चौकार मारणारा फलंदाजदेखील ठरला आहे. त्याच्या नावावर तब्बल 675 चौकारांची नोंद आहे. त्यानंतर विराट कोहलीचा क्रमांक लागतो. त्याने आयपीएलमध्ये 555 चौकार ठोकले आहेत. तसेच 534 चौकारांसह डेव्हिड वॉर्नर तिसर्‍या क्रमांकावर आहे. आयपीएलच्या मेगा ऑक्शनपूर्वी दिल्ली संघाने धवनला रीलिज केले. त्यानंतर पंजाब किंग्जने त्याला 8.25 कोटी रुपये मोजून आपल्या संघात सामील केले आणि सध्या ‘गब्बर’ची बॅट चांगलीच तळपायला लागली आहे.

Back to top button