RCB vs RR : राजस्थानच्या दादागिरीसमोर बेंगलोरची हाराकिरी | पुढारी

RCB vs RR : राजस्थानच्या दादागिरीसमोर बेंगलोरची हाराकिरी

मुंबई ; वृत्तसंस्था : रविचंद्रन अश्‍विन, कुलदीप सेन, प्रसिद्ध कृष्णा यांची भेदक गोलंदाजी आणि रियान परागचे घणाघाती अर्धशतक यांच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने रॉयल चॅलेंजर्स (RCB vs RR) बेंगलोरला 29 धावांनी पराभूत केले व दोन महत्त्वपूर्ण गुणांची कमाई केली. आता आठ सामन्यांतून राजस्थानचे सहा विजयांसह 12 गुण झाले असून, गुणतालिकेत त्यांनी पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे. त्याचवेळी बेंगलोरचे 9 सामन्यांतून 10 गुण झाले आहेत आणि त्यांची पाचव्या स्थानावर घसरण झाली आहे. यापूर्वी 23 एप्रिलला झालेल्या लढतीत याच बेंगलोरचा सनरायझर्स हैदराबादने केवळ 68 धावांत खुर्दा उडवला होता, हे रसिकांना आठवत असेलच.

मंगळवारच्या लढतीत 145 धावांच्या सोप्या लक्ष्याचा पाठलाग करताना बेंगलोरने 115 धावा करून राजस्थानपुढे गुडघे टेकले. त्यांचा सगळा संघ 19.3 षटकांत गारद झाला. त्यांची सुरुवातच डळमळीत झाली आणि त्यातून त्यांचा संघ शेवटपर्यंत सावरू शकला नाही. विराट कोहली केवळ 9 धावा करून प्रसिद्ध कृष्णाचा बळी ठरला. गेल्या शंभरहून अधिक सामन्यांत कोहलीला शतक झळकावता आलेले नाही. मंगळवारी पुन्हा त्याला दारूण अपयशाचा सामना करावा लागला.

कर्णधार फाफ डू प्लेसिस याने 21 धावांची खेळी केली, तर ग्लेन मॅक्सवेल याला भोपळाही फोडता आला नाही. डू प्लेसिस आणि मॅक्सवेल यांना कुलदीप सेनने टिपले. तसेच रजत पाटीदार याचा त्रिफळा रविचंद्रन अश्‍विनने उडवला तो 18 धावांवर. अशा प्रकारे आरसीबीने 10 षटकांत 4 गडी गमावून 58 धावा केल्या. गोव्याचा सुयश प्रभुदेसाई याला अश्‍विनने 2 धावांवर तंबूत पाठवले आणि भरवशाचा दिनेश कार्तिक 6 धावा करून धावबाद झाला. (RCB vs RR)

मग शाहबाज अहमद याला वैयक्‍तिक 17 धावांवर अश्‍विनने तंबूत पाठवले. 16.2 षटकांत बेंगलोरने शंभर धावांचा टप्पा गाठला. मग धोकादायक वानिंदू हसरंगाला (18) कुलदीप सेनने स्वतःच्याच मार्‍यावर टिपले आणि सामना राजस्थानच्या बाजूने झुकवला. प्रसिद्ध कृष्णाने महम्मद सिराजला कुलदीप सेनकरवी झेलबाद करून आणखी एक धक्का दिला.

त्यापूर्वी प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सने निर्धारित 20 षटकांत 8 बाद 144 धावा केल्या. रियान पराग याने नाबाद टोलविलेल्या 56 धावा हे राजस्थानच्या डावाचे मुख्य वैशिष्ट्य ठरले. तसे पाहिले तर त्यांचा डाव सुरुवातीपासूनच ढासळत गेला. सलामीवीर जोस बटलर 8 धावांवर, तर दुसरा सलामीवीर देवदत्त पडिक्कल 7 धावांवर बाद झाला. राजस्थानने रविचंद्रन अश्‍विनला फटकेबाजीसाठी बढती देण्याचा निर्णय घेतला.

अश्‍विनने 9 चेंडूंत 17 धावांची खेळी केली आणि तो महम्मद सिराजची शिकार ठरला. बटलरला जोश हेझलवूडने, तर पडिक्कलला सिराजने टिपले. कर्णधार संजू सॅमसन आपल्या संघाला या पडझडीतून बाहेर काढेल असे वाटत होते. तथापि, 21 चेंडूंत 27 धावा केल्यानंतर तोही बाद झाला. वानिंदू हसरंगाने त्याचा त्रिफळा उडवला. पाठोपाठ डॅरिल मिशेल यानेही तंबूचा रस्ता धरला. त्याने कूर्मगती फलंदाजी करताना 16 धावांसाठी तब्बल 24 चेंडू खर्च केले. जोश हेझलवूडने त्याची खेळी संपवली.

शिमरॉन हेटमायरने केवळ 3 धावा करताना 7 चेंडू घेतले. त्याला हसरंगाने टिपले. एकूणच राजस्थानची सुरुवात डळमळीत झाली आणि कोणत्याच फलंदाजाला मोठे योगदान देता आले नाही. त्यामुळे हा चमू समाधानकारक धावसंख्या उभारू शकला नाही. 15 षटकांचा खेळ संपला तेव्हा कुठे राजस्थानला शंभरीचा टप्पा पार करता आला. हर्षल पटेलने दरम्यानच्या काळात ट्रेंट बोल्टला विराट कोहलीच्या हाती झेल द्यायला लावून राजस्थानची अवस्था 7 बाद 110 अशी दयनीय केली.

रियान पराग याने एकहाती झुंज देत 31 चेंडूंत 56 धावा चोपताना तीन चौकार व चार षटकार ठोकले. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून महम्मद सिराज, वानिंदू हसरंगा आणि जोश हेझलवूड यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले. तसेच हर्षल पटेलने एक मोहरा टिपला. शाहबाज अहमद मात्र महागडा ठरला व त्याने 3 षटकांत 35 धावा मोजल्या.

कोहलीचे दारूण अपयश

विराट कोहली हा जागतिक कीर्तीचा फलंदाज असला तरी यंदाच्या आयपीएलमध्ये त्याची कामगिरी अतिशय सुमार राहिली आहे. आतापर्यंतच्या नऊ सामन्यांत त्याने 14.22 च्या सरासरीने अवघ्या 128 धावा जमवल्या आहेत. त्याने नऊ डावांत 48, 41, 12, 5, 1, 12, 0, 0, 9 अशा धावा केल्या असून, त्याचे आरसीबी संघातील स्थानही धोक्यात आले आहे. विशेष म्हणजे आरसीबीने तब्बल 15 कोटी रुपये मोजून त्याला संघात कायम ठेवले आहे.

Back to top button