MI vs CSK : मुंबईच्या पराभवाची सप्तपदी; चेन्नईचा चित्तथरारक विजय | पुढारी

MI vs CSK : मुंबईच्या पराभवाची सप्तपदी; चेन्नईचा चित्तथरारक विजय

पुढारी ऑनलाईन डेस्क : आपल्याला आजही सर्वोत्तम फिनिशर का म्हणतात हे महेंद्रसिंग धोनीने दाखवून दिले आणि मुंबई इंडियन्सच्या (MI vs CSK) तोंडातून त्याने अलगद विजयाचा घास काढून घेतला. अशाप्रकारे मुंबईला पराभवाची सप्तपदी स्वीकारावी लागली. त्यामुळे त्यांचे यंदाच्या आयपीएलमधील आव्हान जवळपास आटोपले आहे. या चित्तथरारक विजयासह चेन्नईचे आता सात सामन्यांतून चार गुण झाले आहेत, तर मुंबईची पाटी कोरीच राहिली आहे. जयदेव उनाडकटच्या अंतिम षटकात धोनीने 18 धावा कुटल्या व चेन्नईला जवळपास अशक्यप्राय विजय मिळवून दिला. शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना विलक्षण रंगला. धोनीने 13 चेंडूंत 28 धावा कुटताना 3 चौकार ठोकले आणि एकदा चेंडू प्रेक्षकांत भिरकावून दिला.

विजयासाठी आवश्यक असलेल्या 156 धावा चेन्नईने (MI vs CSK) सात गड्यांच्या मोबदल्यात फटकावल्या. त्यांची सुरुवातही मुंबईसारखीच सनसनाटी झाली. त्यांचा भरवशाचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड याला खातेही खोलता आले नाही. डॅनियल सॅम्सने त्याला तिलक वर्माकरवी झेलबाद केले. चेन्नईने अचानकपणे मिशेल सँटनर याला तिसर्‍या क्रमांकावर बढती दिली. त्याने पहिल्याच षटकात दोन चौकार ठोकून शानदार सुरुवात केली. मात्र तोसुद्धा सॅम्सचा बळी ठरला. वैयक्तिक 11 धावांवर जयदेव उनाडकटने त्याचा झेल छान टिपला. फलकावर तेव्हा 16 धावा लागल्या होत्या. अंबाती रायुडूने षटकार खेचूनच डावाला सुरुवात केली. रॉबिन उथप्पाने 25 चेंडूंत 30 धावांची संयमी खेळी केली. त्याने दोन चौकार व तेवढेच षटकार हाणले. त्याला जयदेव उनाडकटने तंबूचा रस्ता दाखवला. रॉबिनची जागा शिवम दुबेने घेतली.

10 षटकांत चेनन्ईने (MI vs CSK) 3 गडी गमावून 68 धावा केल्या. मुंबईप्रमाणेच चेन्नईच्या फलंदाजांनाही धावा काढताना झगडावे लागत होते. ऋतिश शोकीनने तीन षटकांत फक्त 14 धावा दिल्या. त्यामुळे आवश्यक धावगती नऊच्या आसपास आली. त्याचवेळी शिवम दुबे 13 धावांवर सॅम्सची शिकार ठरला. फलकावर तेव्हा 88 धावा लागल्या होत्या. दुबेचा झेल ईशान किशनने टिपला. दुबेची जागा घेतली ती कर्णधार रवींद्र जडेजाने. दरम्यान, 40 धावांची खेळी करून रायुडू बाद झाला. त्यानंतर महेंद्रसिंग धोनी मैदानात उतरला. मात्र, जडेजा अवघ्या 3 धावा करून बाद झाला. ठराविक अंतराने फलंदाज बाद होत गेले आणि विजय चेन्नईच्या हातून निसटत गेला. मुंबईकडून सर्वच गोलंदाजांनी टिच्चून मारा केला. मात्र तो निष्फळ ठरला. मुंबईकडून डॅनियल सॅम्सने 4, उनाडकटने 2 तर रिले मेरेडिथ याने एक मोहरा टिपला. त्यापूर्वी मुंबईने निर्धारित 20 षटकांत सात गडी गमावून 155 धावा केल्या. तिलक वर्माचे नाबाद अर्धशतक (51) आणि चेन्नईचे ढिसाळ क्षेत्ररक्षण यामुळे मुंबईला बर्‍यापैकी धावसंख्या उभारता आली. मुंबईची सुरुवातच दयनीय झाली. सलामीवीर आणि कर्णधार रोहित शर्मा व दुसरा सलामीवीर ईशान किशन यांना भोपळाही फोडता आला नाही. फलकावर तेव्हा केवळ 2 धावा लागल्या होत्या. पाठोपाठ डेव्हाल्ड ब्रेविस हाही तंबूत परतला. त्याने 4 धावा केल्या. विशेष म्हणजे हे तिन्ही बळी मुकेश चौधरीने मिळवले. त्याच्या तिखटजाळ मार्‍यापुढे मुंबईच्या फलंदाजांनी लोटांगण घातले.

  • तिलक वर्माला वैयक्तिक 2 धावांवर जीवदान मिळाले व त्याचा पुरेपूर फायदा त्याने उठवला. तो झेल घेतला गेला असता तर मुंबई संघाला शंभरीही गाठता आली नसती.
  • तिलक वर्माने 43 चेंडूंचा सामना केला. 3 चौकार व 2 षटकार हे त्याचे मुख्य फटके.
  • या लढतीत चेन्नईने गचाळ क्षेत्ररक्षण केले. त्यांनी एकूण चार सोपे झेल सोडले.
  • चेन्नईकडून मुकेश चौधरी सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 3 षटकांत 20 धावांच्या मोबदल्यात 3 मोहरे टिपले.
  • रवींद्र जडेजा हा चेन्नईचा नामधारी कर्णधार असल्याचे पुन्हा सिद्ध झाले. यष्ट्यांच्या मागून संघाची सगळी सूत्रे महेंद्रसिंग धोनीच हलवत होता.
  • तब्बल पाच वेळा आयपीएलचे जेतेपद संपादलेल्या मुंबईची अवस्था एवढी करुण झाली आहे की, त्यांची पराभवाची मालिका खंडित व्हायला तयार नाही.

 


चेन्नई सुपर किंग्जचा संघ :

चेन्नई सुपर किंग्जचा संघ :

रॉबिन उथप्पा, ऋतुराज गायकवाड, अंबाती रायुडू, शिवम दुबे, रवींद्र जडेजा (कर्णधार), महेंद्रसिंग धोनी (विकेटकीपर), मिचेल सँटनर, ड्वेन प्रिटोरियस, ड्वेन ब्राव्हो, मुकेश चौधरी, महिश थिकशन.

मुंबई इंडियन्सचा संघ :

इशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा (कर्णधार), डेवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, किरॉन पोलार्ड, डॅनियल सॅम्स, रॉयली मेरेडिथ, हृतिक शोकीन, जयदेव उनाडकट, जसप्रीत बुमराह.

Back to top button