T20 World Cup : या 5 खेळाडूंवर निवड समितीची नजर | पुढारी

T20 World Cup : या 5 खेळाडूंवर निवड समितीची नजर

मुंबई ; वृत्तसंस्था : भारताने ऑस्ट्रेलियात होऊ घातलेल्या टी-20 विश्वचषकाची (T20 World Cup) तयारी सुरू केली असून आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करणार्‍या खेळाडूंवर निवड समितीची नजर आहे. विश्वचषकासाठी ही लीग महत्त्वाची मानली जाते. सध्याच्या हंगामात सातत्याने चांगली कामगिरी करणार्‍या हार्दिक पंड्या, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, टी. नटराजन आणि उमरान मलिक या पंचकाने निवड समिताला प्रभावित केले आहे. त्यामुळे हे खेळाडू टी-20 विश्वषकासाठी (T20 World Cup) भारतीय संघात स्थान मिळवू शकतात.

युजवेंद्र चहल : गेल्या विश्वचषक संघात स्थान न मिळालेला लेगस्पिनर युजवेंद्र चहल राजस्थान रॉयल्सकडून सातत्याने सुरेख मारा करतोय. 5 सामन्यांत 12 बळी घेऊन तो लीगमधील सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आहे. चहलने प्रति षटक फक्त 6.80 धावा दिल्या आहेत. या कामगिरीच्या जोरावर त्यांचा दावा प्रबळ मानला जात आहे.

हार्दिक पंड्या : बर्‍याच दिवसांपासून फॉर्मसाठी झगडत असलेल्या हार्दिकने झोकात पुनरागमन केले आहे. गेल्या वर्षीच्या टी-20 विश्वचषकात तो खेळला नव्हता. मात्र, आयपीएलमध्ये आपल्या संघासाठी केवळ धावाच करत नाही, तर बळीही मिळवतोय. 5 सामन्यांत 76 च्या सरासरीने 228 धावा करून तो संघातील सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्याने 4 बळीही घेतले आहेत.

 

कुलदीप यादव : फिरकीपटू कुलदीप यादवही फॉर्मात दिसत आहे. तो दिल्ली कॅपिटल्ससाठी प्रत्येक सामन्यात बळी घेत आहे. त्याचा जुना संघ कोलकाता विरुद्ध त्याने 35 धावा देऊन सर्वात जास्त म्हणजे 4 बळी घेतले. लीगमधील 5 सामन्यात त्याने 11 बळी घेतले आहेत. दोनदा तो सामनावीरही ठरला आहे.

टी. नटराजन : दीर्घकाळ संघाबाहेर असलेला डावखुरा वेगवान गोलंदाज टी.नटराजन आयपीएलमध्ये फलंदाजांसाठी घातक ठरत आहे. गेल्या पाच सामन्यांमध्ये त्याने संघासाठी 6 सामन्यांत 12 बळी घेतले आहेत. तो लीगमध्ये पर्पल कॅपच्या शर्यतीत आहेत. इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू मायकेल वॉनसह अनेक दिग्गज खेळाडूंनी त्याचे कौतुक केले आहे.

उमरान मलिक : अनकॅप्ड खेळाडू उमरान मलिक आयपीएलमध्ये 150 किमी प्रतितास या अफाट वेगाने गोलंदाजी करत आहेत. उमरानने आयपीएलच्या 6 सामन्यांत 9 मोहरे टिपले आहेत. उमरानचा सरासरी वेग 145 कि.मी. प्रतितास आहे. त्याचीही भारतीय संघात निवड झाली तर आश्चर्य वाटू नये.

Back to top button