रवी शास्त्री म्हणाले, यंदा नवाच संघ ‘आयपीएल चॅम्पियन’ होईल | पुढारी

रवी शास्त्री म्हणाले, यंदा नवाच संघ ‘आयपीएल चॅम्पियन’ होईल

मुंबई ; वृत्तसंस्था : आयपीएलमधील सर्वात यशस्वी मुंबई आणि चेन्नई या संघांची कामगिरी सर्वात निराशाजनक राहिली आहे. मुंबईला सलग सहा सामन्यांत पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे यंदा आयपीएल कोण जिंकणार, असा प्रश्न क्रीडा चाहत्यांना पडला आहे. या प्रश्नाचे उत्तर भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी दिले आहे. शास्त्रींच्या मते, यंदा आयपीएलचा विजेता संघ नवीनच असेल.

शास्त्री यांनी स्टार स्पोर्टस्ला दिलेल्या मुलाखतीत आयपीएलच्या विजेत्या संघाबाबत अंदाज व्यक्त केला आहे. तसेच रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा संघ प्ले ऑफमध्ये पोहोचेल, असे भाकीत रवी शास्त्री यांनी केले आहे. आरसीबीला पहिल्या सामन्यात पंजाबकडून पराभव पत्कारावा लागला होता. त्यानंतर आरसीबीने दणक्यात पुनरागमन केले. शास्त्री म्हणाले, यंदाच्या हंगामात आयपीएलचा नवीन चॅम्पियन पाहायला मिळेल.

आरसीबी यंदाच्या आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करत आहे. निश्चित आरसीबीचा संघ प्ले ऑफसाठी पात्र ठरू शकतो. आयपीएल स्पर्धा जसजशी पुढे जाईल, तसतसे आरसीबीची कामगिरी आणखी चांगली होईल. प्रत्येक सामन्यानंतर आरसीबीची कामगिरी सुधारत आहे. झालेल्या चुकांमधून संघ शिकत आहे. त्यामुळे आरसीबी नक्कीच प्ले ऑफमध्ये पोहोचेल.

आरसीबीच्या फलंदाजीबाबत बोलताना शास्त्री म्हणाले, नवीन कर्णधार फाफ डू प्लेसिस, विराट कोहली आणि अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल यंदाच्या हंगामात महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतात. आरसीबीच्या विजयात या त्रिकुटाची कामगिरी महत्त्वाची ठरणार आहे. कोहली चांगली कामगिरी करत आहे. ग्लेन मॅक्सवेल किती धोकादायक आहे, हे नव्याने सांगायची गरज नाही. फाफही उत्कृष्ट फलंदाज आहे.

Back to top button