CSK VS SRH : दोन निस्तेज संघ समोरासमोर | पुढारी

CSK VS SRH : दोन निस्तेज संघ समोरासमोर

नवी मुंबई; वृत्तसंस्था : यंदाच्या आयपीएलमध्ये पराभवांची हॅट्ट्रिक केलेला चेन्‍नई सुपर किंग्ज (CSK VS SRH) आणि लागोपाठ दोन सामन्यांत हार स्वीकारावी लागलेला सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील लढत शनिवारी नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर होणार आहे. यात जो संघ विजयी होईल त्याच्या गुणांचे खाते उघडले जाईल हे तर स्पष्टच आहे.

कोलकाता, लखनौ आणि अगदी अलीकडे पंजाब अशा तीन संघांकडून चेन्‍नईला पाठोपाठ दणके बसले आहेत. महेंद्रसिंग धोनी (CSK VS SRH) याच्या नेतृत्वाखाली चार वेळा आयपीएलचे अजिंक्यपद पटकावलेल्या या संघाची दैना झाली आहे. रवींद्र जडेजा याच्याकडे कर्णधारपद सोपवण्यात आले असले तरी धोनीच संघाची कमान सांभाळताना पाहायला मिळतोय. जडेजा सीमारेषेवर उभा असतो आणि धोनीच यष्टिरक्षण करत असताना बहुतांश निर्णय घेतो. चेन्‍नईकडून आतापर्यंतच्या तिन्ही सामन्यांत शिवम दुबे यानेच काय ते सातत्य फलंदाजीत दाखवले आहे. तीन सामन्यांत त्याने 165च्या स्ट्राईक रेटने 109 धावा जमवल्या आहेत. बाकीचे फलंदाज सपशेल अपयशी ठरले आहेत. गोलंदाजीत ड्वेन ब्राव्हो चांगली कामगिरी करत आहे. त्याला अन्य गोलदाजांची साथ मिळणे आवश्यक आहे. आता जर अंतिम चार संघांत स्थान मिळवायचे असेल तर चेन्‍नईला यापुढील प्रत्येक सामन्यात सर्वोत्तम खेळ करावा लागेल.

हैदराबादची (CSK VS SRH) अवस्था चेन्‍नईपेक्षा निराळी नाही. राजस्थान आणि लखनौ यांच्याकडून हैदराबादला दोन हादरे बसले आहेत. केन विलियम्सन याच्या नेतृत्वाखालील या चमूत चांगले खेळाडू असले तरी प्रत्यक्ष मैदानात त्यांच्याकडून चांगला खेळ होताना दिसत नाही. राहुल त्रिपाठी, अभिषेक शर्मा, निकोलस पूरन, एडन मार्कराम यांना उत्तम प्रदर्शन करावे लागेल; अन्यथा आणखी एका पराभवाची नोंद हैदराबादच्या खात्यात होऊ शकते.

आमने-सामने…. (CSK VS SRH)

चेन्‍नई आणि हैदराबाद यांच्यात आयपीएलमध्ये आतापर्यंत 16 सामने झाले असून 12 लढतींत चेन्‍नईने बाजी मारली आहे, तर 4 वेळा हैदराबादची सरशी झाली आहे. तसेच चेन्‍नईने 223 अशी सर्वोच्च धावसंख्या तर 132 अशी नीचांकी धावसंख्या नोंदवली आहे. हैदराबादने 192 सर्वोच्च तर 134 नीचांकी धावसंख्या नोंदवली आहे.

संघ यातून निवडणार :

चेन्‍नई सुपर किंग्ज – रवींद्र जडेजा (कर्णधार), महेंद्रसिंग धोनी, ऋतुराज गायकवाड, मोईन अली, रॉबिन उथप्पा, अंबाती रायुडू, दीपक चहर, केएम आसिफ, तुषार देशपांडे, ड्वेन ब्राव्हो, डेवॉन कॉन्वे, शुभ्रांशू सेनापती, तुषार देशपांडे, शिवम दुबे, महीष तीक्ष्णा, राजवर्धन हंगरगेकर, ड्वेन प्रिटोरियस, मिशेल सँटनर, प्रशांत सोलंकी, सी हरी निशांत, एन जगदीसन, ख्रिस जॉर्डन, के भगत वर्मा, मुकेश चौधरी, सिमरनजीत सिंग.

सनरायझर्स हैदराबाद – केन विलियम्सन (कर्णधार), अब्दुल समद, उमरान मलिक, वॉशिंग्टन सुंदर, निकोलस पूरन, टी नटराजन, भुवनेश्‍वर कुमार, प्रियम गर्ग, राहुल त्रिपाठी, अभिषेक शर्मा, कार्तिक त्यागी, श्रेयस गोपाल, जे सुचिथ, एडेन मार्करम, मार्को जॅन्सेन, रोमारियो शेफर्ड, सीन एबॉट, रविकुमार समर्थ, शशांक सिंग, सौरभ दुबे, विष्णू विनोद, ग्लेन फिलिप्स, फजलहक फारुकी.

 

Back to top button