आयपीएल राईटस् विकून मिळतील 54 हजार कोटी | पुढारी

आयपीएल राईटस् विकून मिळतील 54 हजार कोटी

नवी दिल्ली ; वृत्तसंस्था : इंडियन प्रीमियर लीगचे मीडिया राईटस् विकून भारतीय क्रिकेट नियामक मंडळ बंबर कमाई करणार आहे. 2023 ते 2027 पर्यंतच्या पाच सत्रांचे राईट विकून बीसीसीआय सुमारे 7.2 बिलियन डॉलरची (सुमारे 54 हजार कोटी) कमाई करू शकते. आतापर्यंत टीव्ही 18 वायकॉम, डिज्नी, सोनी, झी, अमेझॉन आणि आणखी एका कंपनीने यासंबंधीची कागदपत्रे खरेदी केली आहेत. असेही म्हटले जात आहे की, अमेरिकन कंपनी अ‍ॅपलही लवकरच कागदपत्रे खरेदी करू शकते.

मीडिया राईटसच्या बाबतीत पाच महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे…

मीडिया राईटस्चे टेंडर डाक्यूमेंटस 10 मेपर्यंत खरेदी केले जाऊ शकतात. त्यानंतर एक महिन्यापर्यंत जमा केलेल्या डाक्यूमेंटसची छाननी करण्यात येईल. तसेच जूनच्या दुसर्‍या आठवड्यात लिलाव जिंकून मीडिया राईटस् मिळविणार्‍या कंपन्यांच्या नावांची घोषणा करण्यात येईल.

बीसीसीआय यावेळी मीडिया राईटस्ची चार वेगवेगळ्या बकेटस्चा लिलाव करणार आहे. पहिल्या बकेटमध्ये भारतीय उपखंडातील टीव्ही राईटस असतील. दुसर्‍या बकेटमध्ये डिजिटल राईटस् तर तिसर्‍या बकेटमध्ये 18 सामन्यांचा समावेश करण्यात आला आहे. या 18 सामन्यांमध्ये हंगामाचा पहिला सामना, आठवड्याअखेरीस होणारे डबल हेडरमध्ये सायंकाळचा सामना तसेच चार प्ले ऑफ सामन्यांचा समावेश आहे. चौथ्या बकेटमध्ये भारतीय उपखंडाबाहेरील प्रसारणाचे अधिकार असतील.

बीसीसीआयने वरील चार बकेटसाठी एकूण 32,890 कोटी रुपये इतकी बेस प्राईस निश्चित केली आहे. प्रत्येक सामन्याचे टेलिव्हीजन राईटस् 49 कोटी रुपयांना निश्चित करण्यात आले आहेत. तर प्रत्येक सामन्याच्या डिजिटल राईटस्ची बेस प्राईस 33 कोटी रुपये असतील. 18 सामन्यांच्या क्लस्टरमधील प्रत्येक सामन्याची बेस प्राईस 18 कोटी रुपये असेल. तर भारतीय उपखंडाबाहेर राईटस्साठी प्रत्येक सामन्याला 3 कोटी रुपये मोजावे लागतील. अशा प्रकारे एकूण रक्कम 32,890 कोटी रुपये इतकी होते. मात्र, बीसीसीआयला मीडिया राईटस् विकून 54 हजार कोटी रुपये मिळतील, असा विश्वास आहे.

Back to top button