Tokyo Olympics 2021: कोलंबियन बॉक्सरचा भारताच्या मेरी कोमला ‘ठोसा’

टोकियो; पुढारी ऑनलाईन : Tokyo Olympics 2021 टोकियो ऑलिम्पिकमधून भारताची स्टार बॉक्सर एमसी मेरी कोमचा प्रवास संपुष्टात आला आहे. गुरुवारी प्री-क्वार्टर फायनलमध्ये तिला कोलंबियाच्या इंग्रिट वॅलेन्सियाकडून पराभव पत्करावा लागला. व्हॅलेन्सीयाने फ्लायवेटच्या ४८-५१ किलो वजनी गटात मेरीवर ३-२ अशी मात केली.

वलेन्सियाविरुद्धच्या सामन्यात मेरी कोमला पहिल्या फेरीत पराभव पत्करावा लागला. दुसर्‍या फेरीत तिने नेत्रदीपक पुनरागमन केले आणि सामना बरोबरीत आणला. परंतु तिस-या फेरीत पराभव पत्करावा लागला. पंचांनी व्हॅलेन्सियाला अनुक्रमे ३०, २९, २७, २९ आणि २८ गुण दिले. त्याच वेळी मेरी कोमला २७, २८, ३०, २८ आणि २९ गुण मिळाले.

सामना हरल्यानंतरही मेरी कोमने लोकांची मने जिंकली. सर्वप्रथम तिने देवाचे आभार मानले. यानंतर मेरीने व्हॅलेन्सियाला मिठी मारली आणि तिच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी तेथे उपस्थित सर्व लोकांना अभिवादन केले. मेरी कोमला माहित होतं की हा तिचा शेवटचा ऑलिम्पिक सामना आहे.

असं म्हटलं जात आहे की, ऑलिम्पिकमधील मेरी कोमचा हा शेवटचा सामना होता. पुढच्या ऑलिम्पिकमध्ये ३८ वर्षीय मेरी ४१ वर्षांची होईल. २०२४ मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे होणार आहेत.

तत्पूर्वी, ऑलिम्पिकच्या सलामीच्या सामन्यात मेरी कोमने शानदार विजय मिळवला होता. राउंड ऑफ ३२ च्या सामन्यात ६ वेळा वर्ल्ड चॅम्पियन राहिलेली डॉमिनिक रिपब्लिकची महिला बॉक्सर मिग्यूलिना हिला नमवत मेरीने आपला पहिला विजय मिळवला. मेरीने महिलांच्या ५१ किलोग्राम वजनी गटात हा सामना ४-१ च्या फरकाने जिंकला.

अधिक वाचा :

पी व्‍ही सिंधू उपांत्यपूर्व फेरीत, टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदकाची संधी

दरम्यान, ऑलिम्पिकचा आजचा सातवा दिवस भारतासाठी चांगला ठरला. आघाडीची बॅडमिंटनपूट पी.व्ही. सिंधूने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. डेन्मार्कच्या मिया ब्लिचफेल्ड्टवर दोन सेटमध्ये सरळ मात करत सिंधूने बॅडमिंटनमध्ये पदकाची आशा कायम ठेवली. अवघ्या ४१ मिनीटांत संपलेल्या या सामन्यात सिंधूने २१-१५, २१-१३ अशी बाजी मारली.

आगामी फेरीत सिंधूसमोर प्रतिस्पर्धीचं मोठं आव्हान असेल. जपानच्या अकाने यामागुची आणि कोरियाच्या किम गेउन यांच्यातील विजेत्या खेळाडूशी सिंधूला दोन हात करायचे आहेत.

भारतीय हॉकी संघाने केला ‘रियो’मधील सुवर्णपदक विजेता अर्जेटिनाचा पराभव

तर भारतीय पुरुष हॉकी संघाने आज टोकियो ऑलिम्पिकमध्ये झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात गतविजेत्या अर्जेंटिनावर ३-१ असा विजय मिळवला. या विजयासह भारताने ऑलिम्पिकच्या उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला आहे.

मध्यांतरापर्यंत एकही संघ गोल करण्यात अपयशी ठरला. तिसऱ्या सत्रात भारतीय खेळाडूंनी आक्रमणाची धार वाढवली. अखेरीस पेनल्टी कॉर्नरवर मिळालेल्या संधीचं सोनं करत वरुण कुमारने ४३ व्या मिनीटाला गोल करत कोंडी फोडली.

पण भारताची ही आघाडी फारकाळ टिकू शकली नाही. अर्जेंटिनाकडून स्कूथ कॅसेलाने ४८ व्या मिनीटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल करत संघाला बरोबरी मिळवून दिली.

सामना १-१ अशा बरोबरीत सुटणार असं वाटत असतानाच ५८ व्या मिनीटाला भारतीय खेळाडूंनी अर्जेंटिनाचा बचाव भेदला. पेनल्टी एरियात प्रवेश करून विवेक सागर प्रसादने गोल केला. याचबरोबर भारताला २-१ अशी आघाडी मिळाली.

अखेरच्या क्षणांमध्ये झालेल्या या गोलमुळे अर्जेंटिनाचा संघ बॅकफूटवर फेकला गेला. ५९ व्या मिनीटाला भारताला पेनल्टी कॉर्नरवर आणखी एक संधी मिळाली. ज्यात हरमनप्रीत सिंगने गोल करत भारताची आघाडी ३-१ ने करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. साखळी फेरीत भारताचा अखेरचा सामना जपानसोबत होणार आहे.

अर्जेंटीवरील विजयासह भारत ग्रुप अ मध्ये ऑस्ट्रेलियानंतर दुसरा क्रमांकावर आहे. भारतीय हॅाकी संघाने या ऑलिम्पिकमध्ये आपला तिसरा विजय नोंदवला आहे, तर एका सामन्यात भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला आहे.

Back to top button