मुंबई ; वृत्तसंस्था : क्रिकेट चाहत्यांमध्ये लोकप्रिय असणार्या समालोचकांपैकी एक चेहरा म्हणजे मयंती लँगर. मागील अनेक वर्षांपासून क्रिकेट जगतामधील दिग्गजांबरोबर क्रिकेटसंदर्भातील टॉक शोमध्ये झळकणारी मयंती आज जगभरात लोकप्रिय झाली आहे.
पुरुषांचे वर्चस्व असणार्या क्रिकेट समालोचनासारख्या क्षेत्रामध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणार्या स्त्रियांमध्ये मयंतीचे नाव घेतले जाते. गेल्या दोन वर्षांपासून ती आयपीएलमध्ये दिसत नव्हती. आई होणार असल्याने तिने दोन वर्षे ब्रेक घेतला होता.
माजी भारतीय क्रिकेटर स्टुअर्ट बिन्नीची पत्नी आणि 1983 च्या विश्वचषक विजेत्या संघातील गोलंदाज रॉजर बिन्नी यांची सून असलेली मयंती पुन्हा एकदा आयपीएलमध्ये ग्लॅमरचा तडका लगावण्यासाठी सज्ज झाली आहे. दोन वर्षांनंतर मयंती पुन्हा एकदा स्टार स्पोर्टस्च्या ब्रॉडकास्टिंग टीमचा भाग असेल.