चिन्‍नास्वामी खेळपट्टीवर आयसीसीचे ताशेरे | पुढारी

चिन्‍नास्वामी खेळपट्टीवर आयसीसीचे ताशेरे

बंगळूर ; वृत्तसंस्था : भारतीय संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळलेल्या पहिल्याच कसोटी मालिकेत श्रीलंकेवर 2-0 असे निर्भेळ यश मिळवले. बंगळूर येथील चिन्‍नास्वामी स्टेडियमवर दिवस-रात्र कसोटी खेळवण्यात आली आणि भारताने 238 धावांनी दणदणीत विजय मिळवला. भारताचे 447 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ 208 धावांवर तंबूत परतला. भारतीय संघाने या विजयासह जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत सुधारणा केली; परंतु आज आयसीसीने चिन्‍नास्वामी खेळपट्टीला ‘सरासरीच्या खालील दर्जाची’ असा शेरा दिला.

सामनाधिकारी जवागल श्रीनाथ यांनी पाठवलेल्या अहवालावरून आयसीसीने हा शेरा दिला आणि खेळपट्टी व आऊटफिल्ड निरीक्षण पद्धतीनुसार खेळपट्टीला एक डीमेरीट गुण (वजा गुण) देण्यात आले आहे. श्रीनाथ यांनी लिहिले की, ‘पहिल्या दिवसापासून चेंडू खेळपट्टीवर अनपेक्षित फिरकी घेत होता आणि सत्रानुसार फिरकीला अधिक मदत मिळत गेली. माझ्या मते ही खेळपट्टी फलंदाजी व गोलंदाजी यांच्यातल्या पोषक स्पर्धेसाठी पूरक नव्हती.

आयसीसीच्या नियमानुसार एखाद्या खेळपट्टीला पाच वजा गुण (डिमेरीट) मिळाल्यास या खेळपट्टीवर 12 महिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर बंदी घातली जाईल. या कसोटीत भारताने आयसीसी गुणतालिकेत चौथे स्थान पटकावले होते आणि आयसीसीच्या या कारवाईचा त्या क्रमवारीवर काहीच परिणाम होणार नाही.

रावळपिंडीच्या खेळपट्टीवरही शेरा

आयसीसीने पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना खेळवल्या गेलेल्या रावळपिंडी मैदानावरील खेळपट्टीलाही एक डिमेरीट गुण देताना सरासरीच्या खालील दर्जाची, असा शेरा दिला आहे. बंगळूरची खेळपट्टी फलंदाजांसाठी घातक होती, पण याउलट रावळपिंडीची खेळपट्टी फलंदाजीसाठी पोषक होती; परंतु यामध्ये गोलंदाजांना फायदेशीर काहीच नसल्याचे आयसीसीचे म्हणणे आहे. या पाच दिवसांच्या कसोटीत तब्बल बाराशे धावा कुटण्यात आल्या. ही कसोटी अनिर्णीत राहिली म्हणून आयसीसीने कारवाई केली.

Back to top button