साताऱ्याच्या प्रविण जाधव याने जगात दुसऱ्या स्थानी असलेल्या खेळाडूला हरवलं, पण... | पुढारी

साताऱ्याच्या प्रविण जाधव याने जगात दुसऱ्या स्थानी असलेल्या खेळाडूला हरवलं, पण...

टोकियो; पुढारी ऑनलाईन : टोकिओ ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय तिरंदाज प्रविण जाधव याने जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या रशियाच्या गलसान बझारझापोव्हला हरवले. एलिमिनेशन राऊंडमध्ये प्रविण जाधव याने ही कामगिरी केली. पण मात्र अंतिम सोळा जणांच्या फेरीत प्रवीणचा अमेरिकेच्या तिरंदाजाने पराभव केला. यामुळे त्याचे वैयक्तिक तिरंदाजी स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.

एलिमिनेशन राऊंडमध्ये ३२ जणांच्या फेरीत प्रविणने रशियाच्या गलसान बझारझापोव्ह याला ६-० ने पराभूत केले. या विजयाने त्याने वैयक्तिक तिरंदाजी स्पर्धेच्या १६ जणांच्या फेरीत प्रवेश केला.

मात्र तेथे त्याला जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या अमेरिकेच्या ब्रॅडी एलिसनचा सामना करावा लागला. १६ जणांच्या फेरीत प्रवीणला ब्रॅडी एलिसनने हरवले.

दरम्यान, १६ जणांच्या फेरीत भारताची तिरंदाज दीपिका कुमारी हिने अमेरिकेच्या जेनिफर मुकिनो-फर्नांडिस हिचा पराभव केला.

प्रविण सातारा जिल्ह्यातील सरडे (ता. फलटण) येथील रहिवाशी आहे. प्रवीणला अगदी लहानपणापासून तिरंदाजीची आवड आहे.

इयत्ता चौथीत असतानाच तो तिरंदाजी हा खेळ प्रकार शिकला. पुढे औरंगाबादनंतर पुणे व दिल्ली या ठिकाणी त्याने प्रशिक्षण घेतले.

त्याचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. त्यानंतर प्रवीणने अमरावती येथे तिरंदाजीचे प्रशिक्षण घेतले.

नेमबाजीतील कौशल्यावर त्याची २०१५ साली आंतरराष्ट्रीय ज्युनिअर कँपसाठी निवड झाली. यातूनच पुढे २०१६ च्या आर्चरी वर्ल्डकप स्पर्धेसाठी भारतीय वरिष्ठ संघात त्याला संधी मिळाली.

याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मध्ये प्रविणचे भरभरून कौतुक केले होते.

बॉक्‍सिंगमध्‍ये पूजा राणी तर तिरंदाजीत दीपिकाकुमारी पुढील फेरीत

टोकिया ऑलिम्‍पिकमध्‍ये आज (दि. २८) अन्य भारतीय खेळाडुंनी चमकदार कामगिरी केली. बॉक्‍सिंगमध्‍ये पूजा राणी तर तिरंदाजीत दीपिकाकुमारी या दोघींनी पुढील फेरीत प्रवेश केला.  पूजा राणी आणि दीपिकाकुमारी यांच्‍यासह बॅडमिंटनपटू पी. व्‍ही. सिंधू हिने आपली विजयाची मालिका कायम ठेवली आहे. या भारताचे पदक पटकवण्‍याची आशा कायम राहिली आहे.

हे ही वाचा :

Back to top button