‘रॉयल चॅलेंजर्स’चा कर्णधार फाफ ड्युप्लेसिस? | पुढारी

‘रॉयल चॅलेंजर्स’चा कर्णधार फाफ ड्युप्लेसिस?

बंगळूर ; वृत्तसंस्था : आयपीएल अर्थात इंडियन प्रीमियर लीगचा 15 वा हंगाम येत्या 26 मार्चपासून सुरू होत आहे. विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) या संघामध्ये तर मोठा फेरबदल करण्यात आला असून, लवकरच आरसीबीला नवा कर्णधार मिळणार आहे. दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज फाफ ड्युप्लेसिस याची विराटचा वारसदार म्हणून नियुक्ती झाली असून, त्यासाठी येत्या 12 मार्चला पत्रकार परिषद घेतली जाणार आहे.

यंदाच्या हंगामात दोन नव्या संघांची भर पडल्यामुळे सामने रोहमर्षक होणार आहेत. यावेळी सर्वच संघांत थोडेफार बदल करण्यात आले आहेत. विराटने आयपीएल-2021 नंतर संघाचे कर्णधारपद सोडलेले असून, आरसीबी आपला पहिला सामना 27 मार्च रोजी पंजाबविरोधात खेळणार आहे. या अगोदर संघाचा कर्णधार निश्चित करणे गरजेचे आहे.

याच कारणामुळे साऊथ आफ्रिकन खेळाडू ड्युप्लेसिसचे नाव कर्णधार म्हणून निवडण्यात आलेय. येत्या 12 मार्चला आरसीबीने पत्रकार परिषदेचे आयोजन केले असून, यामध्ये कर्णधार म्हणून ड्युप्लेसिसचे नाव जाहीर केले जाणार आहे. आयपीएल-2021 नंतर कोहलीने आरसीबीचे कर्णधारपद सोडले. तेव्हापासून हे पद रिकामेच आहे.

ड्युप्लेसिसचे नाव कर्णधारपदासाठी निश्चित होण्याअगोदर ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलच्या गळ्यात आरसीबीच्या कर्णधारपदाची माळ पडणार असल्याचे म्हटले जात होते. मात्र, तीन सामन्यांमध्ये मॅक्सवेलची उपस्थिती नसेल. याच कारणामुळे संघाने ड्युप्लेसिसचा कर्णधारपदासाठी विचार केल्याचे समजते आहे. फाफ ड्युप्लेसिस साऊथ आफिकन क्रिकेट संघाचा माजी कर्णधार असल्याने त्याच्याकडे चांगला अनुभव आहे. एकदिवसीय, टी-20 आणि कसोटी अशा तीनही प्रकारांत कर्णधार म्हणून त्याने चांगली कामगिरी केलेली आहे.

Back to top button