रौप्य पदक विजेत्या मीराबाई चानू साठी डॉमिनोज पिझाची खास ऑफर

टोकियो; पुढारी ऑनलाईन :

टोकियो ऑलिम्पिकमध्ये वेटलिफ्टर मीराबाई चानू ४९ वजनी गटात रौप्य पदक विजेती ठरली. यानंतर तिच्यावर भारतातून अभिनंदनाचा वर्षाव सुरु झाला. तिने २१ वर्षानंतर वेटलिफ्टिंगमध्ये भारताला ऑलिम्पिक पदक मिळवून दिले.

पदक जिंकल्यानंतर तिने एका वृत्तसंस्थेशी बोलताना तिला पिझा खाण्याची इच्छा बोलून दाखवली होती. त्यानंतर डॉमिनोज पिझा या प्रसिद्ध पिझा फ्रेंचायजीने मीराबाई चानू साठी एक खास घोषणा केली.

या फ्रेंचायजीने मीराबाई चानूला आयुष्यभर मोफत पिझा देण्याची घोषणा केली. त्यांनी ही माहिती ट्विट करुन दिला. डॉमिनोजने आपल्या अधिकृत अकाऊंटवरून ‘मीराबाई चानू पदक घरी आणल्याबद्दल अभिनंदन तू करोडो भारतीयांचे आयुष्यभराचे स्वप्न पूर्ण केलेस. त्यामुळे तुला आयुष्यभर मोफत डॉमिनोज पिझा देण्यास अत्यानंद होत आहे.’

मीराबाई चानूने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दरम्यान, ‘पदक जिंकल्यानंतर पहिल्यांदा मी पिझा खाण्यासाठी जाणार आहे. पिझा खाऊन खूप काळ लोटला. मी तो आज भरपूर खाणार आहे’ अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर डॉमिनोज पिझाने आयुष्यभर मोफत पिझा देण्याची घोषणा केली.

ऑलिम्पिकमध्ये रौप्य कामगिरी करणाऱ्या मीराबाई चानूवर बक्षीसांचा वर्षाव होत आहे. मणिपूर सरकारने तिला १ कोटी रुपयांचे बक्षीस आणि राज्य सरकारची नोकरी देण्याची घोघणा केली आहे.

Back to top button