Deepak Chahar : दीपक चहरला साडे चौदा कोटी मोजूनही चेन्नईची धाकधूक वाढली ! | पुढारी

Deepak Chahar : दीपक चहरला साडे चौदा कोटी मोजूनही चेन्नईची धाकधूक वाढली !

पुढारी ऑनलाईन डेस्क : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज दीपक चहर (Deepak Chahar) हा वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यादरम्यान जखमी झाला. त्यामुळे भारतीय संघाचा तणाव वाढला आहे. शिवाय धोनीची चेन्नई सुपर किंग्जही देखील नाराज झाली आहे. १२ आणि १३ फेब्रुवारीला झालेल्या मेगा लिलावात दीपकला फ्रँचायझीने तब्बल १४ कोटी रुपयांना विकत घेतले आहे. तिसऱ्या टी-२० सामन्यात चहरने केवळ ११ चेंडू टाकले आणि वेस्ट इंडिजच्या दोन्ही सलामीवीरांची शिकार केली.

विंडिज विरुद्धच्या सामन्यात दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर चहर (Deepak Chahar) खूप अस्वस्थ दिसला आणि दुखापतीमुळे तो जमिनीवर बसला. त्रास खूपच वाढल्याने तो ओव्हर देखिल पूर्ण करु शकला नाही. त्यामुळे त्याला सिंग रूममध्ये परत जावे लागले.

श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून बाहेर पडण्याची शक्यता (Deepak Chahar)

२४ फेब्रुवारीपासून लखनऊमध्ये श्रीलंकेविरुद्ध ३ सामन्यांची टी-२० मालिका सुरू होत आहे. दुखापतीमुळे दीपक चहर या मालिकेतून बाहेर पडण्याची शक्यता आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, आयपीएल सीझन २७ मार्चपासून सुरू होत आहे. चहर सध्या ज्या प्रकारची दुखापत झाली आहे, ते पाहता त्याला बरे होण्यासाठी ६ आठवड्यांचा कालवधी लागू शकतो. अशा परिस्थितीत चेन्नई सुपर किंग्जसांठी मोठी समस्या निर्माण होऊ शकते. चहरला गोलंदाजीसोबतच फलंदाजीही चांगली करता येते. गेल्या अनेक मोसमात तो चेन्नईसाठी सातत्याने चांगली कामगिरी करत आला आहे. अशा परिस्थितीत धोनीच्या संघाला कोणत्याही परिस्थितीत आपला खेळाडू गमावायचा नाही.

टीम इंडिया ६ वर्षांनंतर टी २० मध्ये बनली नंबर वन

वेस्ट इंडिजविरुद्धचा तिसरा टी-२० सामना जिंकून टीम इंडिया ६ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर आयसीसी टी-२० क्रमवारीत पहिल्या स्थानावर पोहोचली आहे. यापूर्वी, ३ मे २०१६ रोजी, संघ टी-२० क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर होता. त्यावेळी कर्णधार महेंद्रसिंग धोनी होता. धोनीनंतर रोहितने संघाला पहिल्या स्थानावर नेले. एमएस धोनीनंतर विराट कोहलीला संघाचा कर्णधार बनवण्यात आले, पण विराट आपल्या नेतृत्वाखाली संघास पहिल्या स्थानावर पोहचवू शकला नाही.

Back to top button