टीम इंडियाला धक्‍का, शिखर धवन, श्रेयस अय्यर, ऋतुराजसह आठ खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह

अहमदबाद ; वृत्तसंस्था : वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपली असतानाच टीम इंडियाला जबरदस्त धक्‍का बसला आहे. भारतीय संघातील आठ खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. कोरोना संक्रमित खेळाडूंपैकी तिघांची नावे उघड झाली असून यामध्ये डावखुरा सलामी फलंदाज शिखर धवन, श्रेयस अय्यर व ऋतुराज गायकवाड यांचा समावेश आहे.

भारताचा क्रिकेट संघ सध्या अहमदाबादमध्ये आयसोलेशनमध्ये आहे. बीसीसीआयचे वैद्यकीय पथक या खेळाडूंवर नजर ठेऊन आहे. दरम्यान, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ लवकरच कोरोना संक्रमित खेळाडूंच्या स्थानावर दुसर्‍या खेळाडूंच्या नावांची घोषण करण्याची शक्यता आहे.

दरम्यान, बीसीसीआयचे ट्रेझर अरुण धुमल यांनी भारतीय संघातील काही खेळाडू व सपोर्ट स्टाफमधील सदस्य कोरोना संक्रमित झाल्याच्या वृत्तीची पुष्टी केली आहे. यासंदर्भात बोलताना ते म्हणाले, की काही खेळाडू आणि सपोर्ट स्टाफचे काही सदस्य कोरोनाबाधित आढळले असून बीसीसीआयकडून स्थितीवर नजर ठेवण्यात येत आहे.

बीसीसीआयने यापूर्वीच तामिळनाडूचा अष्टपैलू खेळाडू शाहरूख खान व लेगस्पिनर साई किशोर यांना स्टँडबाय खेळाडू म्हणून घोषित केले आहे. ते आता संघात सहभागी होऊ शकतात. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन वन-डे सामन्यांची मालिका 6 फेब्रुवारीपासून अहमदाबादमध्ये सुरू होत आहे.

Exit mobile version