West Indies vs England : विंडीजचा इंग्लंडवर मालिका विजय | पुढारी

West Indies vs England : विंडीजचा इंग्लंडवर मालिका विजय

ब्रिजटाऊन ; वृत्तसंस्था : वेस्ट इंडिज आणि इंग्लंड (West Indies vs England) यांच्यात ब्रिजटाऊन येथे खेळल्या गेलेल्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील अंतिम सामन्यात 17 धावांनी विजय नोंदवून यजमानांनी मालिका 3-2 ने जिंकली. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने 20 षटकांत 4 गडी गमावून 179 धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ 19.5 षटकांत 162 धावांत आटोपला.

सामन्याचा आणि मालिकेचा नायक अष्टपैलू जेसन होल्डर ठरला. त्याने शेवटच्या सामन्यात सलग चार चेंडूत 4 बळी घेत इंग्लंडला 19.5 षटकांत 162 धावांत गुंडाळले. होल्डरला त्याच्या घातक गोलंदाजीसाठी सामनावीर आणि मालिकेतील त्याच्या उत्कृष्ट अष्टपैलू कामगिरीसाठी मालिकावीर म्हणून सन्मानित करण्यात आले.

वेस्ट इंडिजचा कर्णधार किरॉन पोलार्डने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय योग्य ठरला. ब्रेंडन किंग (34) आणि काइल मेयर्स (31) यांनी पहिल्या विकेटसाठी 59 धावांची भागीदारी केली.

ही भागीदारी आदिल रशीदने मेयर्सला बाद करून तोडली. यानंतर कॅरेबियन संघाला 67 धावांवर दुसरा धक्‍का बसला आणि वैयक्‍तिक 6 धावांवर रोमारिओ शेफर्ड लियाम लिव्हिंगस्टोनचा बळी ठरला. 89 धावांवर किंगच्या रूपात तिसरा धक्‍का बसला.

निकोलस पूरनची 24 चेंडूंत 21 धावांची खेळी राशिदने संपुष्टात आणली. त्यानंतर कर्णधार पोलार्ड आणि रोव्हमन पॉवेल यांनी आक्रमक पवित्रा घेत पाचव्या विकेटसाठी अवघ्या 33 चेंडूंत 74 धावांची नाबाद भागीदारी केली. वेस्ट इंडिजने 20 षटकांत 4 बाद 179 धावसंख्येपर्यंत मजल मारली.

180 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात खराब झाली. पाहुण्या संघाला पहिला धक्का जेसन रॉय (8) च्या रूपाने 8 धावांवर बसला. टॉम बँटन (16) आणि जेम्स विन्स यांनी दुसर्‍या विकेटसाठी 32 धावांची भागीदारी केली. ओडियन स्मिथने बँटनला 16 धावांच्या वैयक्‍तिक स्कोअरवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. कर्णधार मोईन अली 14 आणि लियाम लिव्हिंगस्टोन केवळ 6 धावांचे योगदान देऊ शकले.

चार चेंडूंत चार विकेट घेणारा होल्डर चौथा गोलंदाज (West Indies vs England)

जेसन होल्डर आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये चार चेंडूत चार विकेट घेणारा चौथा गोलंदाज ठरला आहे. त्याच्याआधी अफगाणिस्तानचा रशीद खान, श्रीलंकेचा लसिथ मलिंगा आणि आयर्लंडचा कर्टिस कॅम्पर यांनी हा विक्रम आपल्या नावावर केला आहे. जेसन होल्डरने इंग्लंडच्या ख्रिस जॉर्डन, सॅम बिलिंग्ज, आदिल रशीद आणि शकीब महमूद यांना तंबूचा रस्ता दाखवला.

अंतिम सामन्यातील शेवटचे षटक टाकण्यासाठी जेसन होल्डर आला. इंग्लंड संघाला 6 चेंडूत 20 धावा हव्या होत्या. पहिला चेंडू नो बॉल होता ज्यावर सॅम बिलिंग्स फक्‍त एक धाव घेऊ शकला.

त्यानंतर होल्डरने ख्रिस जॉर्डनला टाकलेल्या चेंडूवर धाव निघाली नाही. पुढच्याच चेंडूवर ख्रिस जॉर्डन झेल बाद झाला. हेडन ज्युनियर वॉल्शने त्याचा झेल पकडला. पुढच्या चेंडूवर दुसर्‍या टोकाला सर्वोत्तम फलंदाजी करणारा सॅम बिलिंगही मोठा फटका खेळण्याच्या नादात वॉल्शच्या हाती झेलबाद झाला.

होल्डरच्या हॅट्ट्रिक चेंडूचा सामना आदिल रशीद करणार होता. रशीदने एक उंच शॉट खेळला. पण चेंडू थेट स्मिथच्या हातात गेला. अशा प्रकारे होल्डरने हॅटट्रिक पूर्ण केली. त्यानंतर षटकाच्या पाचव्या चेंडूवर त्याने शाकिब महमूदला क्लीन बोल्ड करून सलग चार चेंडूंत चार बळी घेण्याचा अनोखा विक्रम केला.

Back to top button