टोकियो ऑलिम्पिक : पी. व्ही. सिंधू, मेरी कोमला विक्रमाची संधी | पुढारी

टोकियो ऑलिम्पिक : पी. व्ही. सिंधू, मेरी कोमला विक्रमाची संधी

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेला आता काही दिवसच शिल्लक आहेत. भारताकडून यावेळी 18 खेळांमध्ये 125 खेळाडू सहभाग नोंदविणार आहेत. आजवर भारतीय अ‍ॅथलिटस्ने वैयक्तिक 15 पदके मिळवली आहेत. यामध्ये एक सुवर्ण, चार रौप्य आणि 10 कांस्यपदकांचा समावेश आहे.

यामधील पाच पदके भारतीय महिला अ‍ॅथलिटसनी् वैयक्तिक मिळवली आहेत. आजवर कुस्ती खेळाडू सुशील कुमारला दोन ऑलिम्पिक पदके मिळाली आहेत. त्याने 2008 बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्य आणि 2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदकाची कमाई केली.

यावेळी बॅडमिंटन खेळाडू पी. व्ही. सिंधू आणि बॉक्सर मेरी कोम यांच्याकडे सुशील कुमारच्या विक्रमाची बरोबरी करण्याची संधी आहे. मेरी कोमने 2012 आणि सिंधूने 2016 मध्ये ऑलिम्पिक पदक जिंकले होते.

मेरी कोम :

सहा वेळची जागतिक चॅम्पियन असलेली मेरी कोम (51 किलो) दुसर्‍यांदा ऑलिम्पिक स्पर्धेत सहभाग नोंदविणार आहे. यावर्षी मेमध्ये कझाकिस्तानमध्ये आशियाई बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत तिने रौप्यपदक जिंकले होते.

आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत तिची सात सुवर्णपदके आहेत. तिने आशियाई स्पर्धेत दोन पदके मिळवली आहेत. 2018 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत तिने सुवर्णपदक मिळवले. महिला बॉक्सिंगला पहिल्यांदा 2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये सहभागी करण्यात आले.

मेरी कोमने पहिल्याच ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक मिळवले; पण रियो ऑलिम्पिकमध्ये तिला पात्रता मिळवता आली नाही. यावेळी मात्र तिच्याकडे सुशील कुमारच्या विक्रमाशी बरोबरी साधण्याची संधी आहे.

पी. व्ही. सिंधू :

बॅडमिंटनमध्ये पी. व्ही. सिंधूकडून महिला एकेरीत पदकाची अपेक्षा आहे. सिंधू टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळवणारी एकमात्र महिला बॅडमिंटन खेळाडू आहे. तिने 2016 रियो ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक मिळवले होते. यावेळी तिला सोपा ग्रुप मिळाला आहे.

रियो ऑलिम्पिकच्या फायनलमध्ये तिला पराभूत करणारी स्पेनची कॅरोलिना मारिन ही दुखापतीमुळे बाहेर आहे. त्यामुळे सिंधूला पदकाचे प्रबळ दावेदार समजले जात आहे. सिंधूने जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत एक सुवर्णपदकासह पाच पदके जिंकली आहेत. 2013 आणि 2014 मध्ये तिने कांस्यपदक मिळवले.

2017 व 2018 मध्ये रौप्य तर, 2019 मध्ये तिने सुवर्णपदक मिळवले. सिंधूने 2014 आशियाई क्रीडा स्पर्धेत महिला सांघिक गटांत कांस्यपदक मिळवले आहे. तर, जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेत तिने रौप्यपदक पटकावले.

Back to top button