India vs South Africa : भारत व्हाईट वॉश टाळणार? | पुढारी

India vs South Africa : भारत व्हाईट वॉश टाळणार?

केपटाऊन ; वृत्तसंस्था : पहिल्या दोन सामन्यांतील पराभवानंतर व्हाईट वॉशपासून वाचण्यासाठी प्रयत्न करत असलेला भारतीय संघ रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (India vs South Africa) होणार्‍या तिसर्‍या आणि शेवटच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात काही बदलासह मैदानात उतरू शकतो.

पहिल्या दोन सामन्यांत भारतीय संघाची रणनीती पूर्णपणे अयशस्वी ठरली. फलंदाजांना देखील मोठ्या भागीदारी करता आल्या नाहीत. जसप्रीत बुमराह सोडून इतर भारतीय गोलंदाजांनी निराशा केली तसेच त्यांची गोलंदाजी क्लब दर्जाची भासली. या दोन्ही सामन्यांत भारतीय गोलंदाजांना केवळ सात विकेट मिळवता आले. रविचंद्रन अश्‍विन आणि भुवनेश्‍वर कुमार सारखे अनुभवी गोलंदाज रासी वान डर डुसेन, जानेमन मलान आणि क्विंटन डिकॉक यांना आव्हान उपस्थित करू शकले नाही.

पहिल्या दोन सामन्यांतील अपयशानंतर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड तिसर्‍या लढतीत जयंत यादव आणि दीपक चाहर यांना संधी देऊ शकतात. पहिले दोन सामने बोलँड पार्कवर खेळविण्यात आले होते. येथील परिस्थिती भारतातील खेळापट्ट्याप्रमाणे असल्याचे कर्णधार राहुलने स्वीकार केले होते. असे असूनदेखील भारतीय खेळाडूंची निराशाजनक कामगिरी चिंतेचा विषय आहे.

न्युलँड्स येथील खेळपट्टीवर गती मिळण्याची शक्यता असली तरीही भारतीय संघ विजय मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल. कर्णधार राहुलसाठी पहिल्या कसोटीत शतक वगळता फारशी चमक दाखवता आली नाही. तसेच त्याच्या नेतृत्वगुणाची चुणूकदेखील पहायला मिळालेली नाही.

पहिल्या दोन सामन्यांत राहुलने फलंदाज म्हणूनदेखील निराश केले. त्याला स्ट्राईक रोटेट करता येत नव्हती. त्यामुळे नंतर येणार्‍या फलंदाजांवर दबाव वाढला. रोहित शर्माचे पुनरागमन झाल्यास राहुलला वरच्या फळीतील आपले स्थान गमवावे लागू शकते. कारण, शिखर धवनने पुनरागमन करताना चांगला फॉर्म दाखवला. विराट कोहलीने पहिल्या सामन्यात 51 धावा केल्या. पण, त्याला एकदिवसीय कर्णधारपदावरून हटविण्यात आले. श्रेयस अय्यर आणि वेंकटेश अय्यर यांना अजूनपर्यंत प्रभाव पाडता आलेला नाही. या दोघांचा फॉर्म भारतासाठी चिंतेचा विषय आहे.

भारत वि. द.आफ्रिका (India vs South Africa)

स्थळ : केपटाऊन
वेळ : दुपारी 2 वाजता.
प्रक्षेपण : स्टार स्पोर्टस्

Back to top button