आयपीएल लिलाव : श्रेयस, चहल, वॉर्नर अव्वल गटात - पुढारी

आयपीएल लिलाव : श्रेयस, चहल, वॉर्नर अव्वल गटात

नवी दिल्ली ; वृत्तसंस्था : भारतीय फलंदाज श्रेयस अय्यर आणि स्पिनर युजवेंद्र चहल शिवाय ऑस्ट्रेलियाचा आक्रमक फलंदाज डेविड वॉर्नर यांना इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) पुढील महिन्यात होणार्‍या महालिलावासाठी अव्वल गटामध्ये (मार्की प्लेअर) ठेवण्याची शक्यता आहे. 27 मार्चपासून सुरू होण्याची शक्यता असलेल्या आयपीएलच्या लिलावाकरता 1,214 खेळाडूंनी नावे नोंदवली आहेत. आयपीएल लिलाव 12 आणि 13 फेब्रुवारीला बंगळूर येथे होणार आहे.

श्रेयस आणि चहल शिवाय 10 संघ सीनियर सलामी फलंदाज शिखर धवन, ईशान किशन, जलदगती गोलंदाज शार्दुल ठाकूर आणि दीपक चाहर, गेल्या वेळी सर्वाधिक विकेट मिळवणारा हर्षल पटेल आणि आवेश खान तसेच स्पिनर राहुल चाहर व अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर सारख्या भारतीय खेळाडूंवर बोली लावतील.

विदेशी खेळाडूंमध्ये वॉर्नर आणि दक्षिण आफ्रिकेचा जलदगती गोलंदाज कागिसो रबाडा, इंग्लंडचा मार्क वुड, ऑस्ट्रेलियाचा मिचेल मार्श आणि पॅट कमिन्स तसेच न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्टवर मोठी बोली लावली जाऊ शकते. फाफ डुप्लेसिस आणि ड्वेन ब्रावो सारख्या खेळाडूंना चेन्‍नई सुपर किंग्ज पुन्हा आपल्या ताफ्यात घेऊ शकते. एकूण 1214 खेळाडूंनी (896 भारतीय आणि 318 विदेशी) आयपीएल 2022 च्या लिलावासाठी नोंदणी केली आहे.

ऑस्ट्रेलियाचे सर्वाधिक 59 खेळाडू रिंगणात (आयपीएल लिलाव)

यावेळी विदेशातून ऑस्ट्रेलियाचे सर्वाधिक 59 आणि दक्षिण आफ्रिकेचे 48 खेळाडू लिलावात सहभागी होतील. याशिवाय वेस्ट इंडिज (41), श्रीलंका (36), इंग्लंड (30), न्यूझीलंड (29) आणि अफगाणिस्तान (20) या देशांतील खेळाडूंनी देखील लिलावासाठी नावे नोंदवली आहेत. तसेच नामिबिया (5), नेपाळ (15), नेदरलँड (1), ओमान (3), स्कॉटलंड (1), झिम्बाब्वे (2), आयर्लंड (3) आणि संयुक्‍त अरब अमिरात (1) मधील खेळाडूदेखील लिलावात सहभागी होतील.

संघांच्या पर्समध्ये 90 कोटी रुपये

भारतीयांमध्ये आर अश्‍विन, श्रेयस अय्यर, शिखर धवन, ईशान किशन, सुरेश रैना, तर परदेशी खेळाडूंमध्ये पॅट कमिन्स, अ‍ॅडम झम्पा, स्टीव्हन स्मिथ, शाकिब अल हसन, मार्क वुड, ट्रेंट बोल्ट, फाफ डू प्लेसिस, क्विंटन डी कॉक, कागिसो रबाडा, ड्वेन ब्राव्हो यांचा समावेश आहे. यावेळी आयपीएल 2022 साठी संघांची पर्स 85 कोटींवरून 90 कोटी रुपये करण्यात आली आहे.

27 खेळाडू रिटेन; सहाजण नव्या संघात

खेळाडूंच्या लिलावापूर्वी सर्व संघांनी 33 खेळाडूंना रिटेन किंवा निवडले गेले. सध्या असलेल्या आठ आयपीएल फ्रेंचायजीनी एकूण 27 खेळाडूंना रिटेन केले आहे. ज्यामध्ये चेन्‍नई सुपर किंग्जमध्ये महेंद्रसिंग धोनी, मुंबई इंडियन्समध्ये रोहित शर्मा आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरमध्ये विराट कोहलीचा समावेश आहे. आयपीएलच्या दोन नवीन संघांनी सहा खेळाडूंची निवड केली. ज्यामध्ये हार्दिक पंड्याला अहमदाबादने तर, केएल राहुलला लखनौ फ्रेंचायजीने कर्णधार म्हणून निवडले आहे. ज्या खेळाडूंना रिटेन करण्यात आले त्यामध्ये जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा, केन विलियम्सन, जोस बटलर, ग्लेन मॅक्सवेल यांचा समावेश आहे.

Back to top button