India vs South Africa : टीम इंडियाला बरोबरीची संधी - पुढारी

India vs South Africa : टीम इंडियाला बरोबरीची संधी

पार्ल ; वृत्तसंस्था : भारत-दक्षिण आफ्रिका संघातील (India vs South Africa) दुसरा एकदिवसीय सामना शुक्रवारी होणार असून, मालिकेतील आपले आव्हान कायम ठेवण्यासाठी भारतीय फलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागेल. या सामन्यात कर्णधार के. एल. राहुल याच्या नेतृत्वाचीदेखील पारख होईल. कर्णधार म्हणून पहिल्या सामन्यात राहुल अयशस्वी झाला. भारतीय फलंदाजांनी पहिल्या लढतीत निराशाजनक कामगिरी केली. त्यामुळे भारताला पराभव स्वीकारावा लागला.

जेव्हा विराट कोहली भारतीय संघाचा कर्णधार होता तेव्हापासून मध्यक्रमाची कामगिरी चिंतेचा विषय होता. ज्याचे समाधान अजूनपर्यंत निघालेले नाही. सलामी फलंदाज शिखर धवनने अर्धशतक झळकावत चांगले पुनरागमन केले. त्याने कोहलीसोबत भागीदारी रचत भारताच्या विजयाच्या अपेक्षा उंचावल्या होत्या; पण हे दोघे माघारी परतल्यानंतर मध्यक्रम ढासळला. व्यंकटेश अय्यरला संघात सहभागी करूनदेखील गोलंदाजी दिली नाही. त्यामुळे दुसर्‍या लढतीत सूर्यकुमार यादवला संधी मिळण्याची शक्यता आहे.

गेल्या लढतीत रासी-वान-डर-डुसेन आणि बावुमा खेळत होते. तेव्हा राहुलने कर्णधार म्हणून अश्विन व चहलसोबत चर्चा केली होती का हा एक प्रश्नच आहे. राहुलने गोलंदाजीत बदल केले; पण ते यशस्वी ठरले नाहीत. या उलट दक्षिण आफ्रिकेने एडन मार्करामकडून गोलंदाजी करून घेतली आणि त्याने भारतीय कर्णधारला बाददेखील केले.

दुसर्‍या लढतीत भारताला विजय मिळवायचा झाल्यास मध्यक्रमाला चांगली कामगिरी केल्याशिवाय पर्याय नाही. श्रेयस अय्यरला शॉर्ट पिच गोलंदाजी विरुद्ध चांगला खेळ करावा लागेल. ऋषभ पंतकडूनदेखील संघाला अपेक्षा आहेत.

भारतीय गोलंदाजांंनादेखील विजय मिळवायचा झाल्यास चमक दाखवावी लागेल. शार्दुल ठाकूरने गेल्या लढतीत अर्धशतक झळकावले. मात्र, त्याला गोलंदाजीत सुधारणा करावी लागेल. अश्विन व चहलला गेल्या लढतीत छाप पाडता आली नाही; पण दक्षिण आफ्रिकेकडून याच खेळपट्टीवर एडन मार्कराम, तबरेज शम्सी आणि केशव महाराज यांनी विकेट मिळवले. त्यामुळे भारताला यामध्ये सुधारणा करण्याची गरज आहे.

भारत वि. द.आफ्रिका (India vs South Africa)

स्थळ : पार्ल
वेळ : दुपारी 2 वाजता.
प्रक्षेपण : स्टार स्पोर्टस्

Back to top button