U-19 World Cup 2022 : भारत उपांत्यपूर्व फेरीत - पुढारी

U-19 World Cup 2022 : भारत उपांत्यपूर्व फेरीत

तारौबा (त्रिनिदाद) ; वृत्तसंस्था : जेतेपदाचे प्रबळ दावेदार आणि विक्रमी चारवेळा विजेत्या भारताने आयर्लंडवर 174 धावांनी विजय मिळवत 19 वर्षांखालील विश्वचषक (U-19 World Cup 2022) स्पर्धेच्या सुपर लीग उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला. भारताने यापूर्वी दक्षिण आफ्रिकेला 45 धावांनी पराभूत करीत स्पर्धेला विजयाने सुरुवात केली होती. आयर्लंडविरुद्ध भारताचा विजय यासाठी महत्त्वाचा आहे की, संघातील सहा खेळाडूंना कोरोनाची लागण झाली असूनही विजय मिळवला.

आयर्लंड संघाने (U-19 World Cup 2022) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर भारताच्या हरनूर सिंहने 88 धावांची आक्रमक खेळी केली. त्याला अंगक्रीश रघुवंशीने (79) चांगली साथ दिली. या दोघांच्या खेळीमुळे भारताला 5 बाद 307 धावसंख्येपर्यंत पोहोचता आले. आव्हानाचा पाठलाग करणार्‍या आयर्लंड संघाला 39 षटकांत 133 धावसंख्येपर्यंतच पोहोचता आले. कर्णधार यश धूल आणि उपकर्णधार शेख राशीद यांची नावेदेखील कोरोनाची लागण झालेल्या खेळाडूंमध्ये होती. त्यामुळे निशांत सिंधूने संघाचे नेतृत्व केले.

हरनूर आणि अंगक्रीश यांनी पहिल्या विकेटसाठी 164 धावांची भागीदारी रचली. हरनूरने आपल्या डावात 12 चौकार तर, अंगक्रीशने 10 चौकार व दोन षटकार लगावले. कार्यवाहक कर्णधार निशांत सिंधू (34) आणि राज बावा (42) यांनी तिसर्‍या विकेटस्साठी 64 धावांची भागीदारी रचली. राजवर्धन हंगर्गेकरने शेवटच्या षटकामध्ये 17 चेंडूंत 39 धावा करीत भारताची धावसंख्या 300 च्या पुढे नेली.

आयर्लंडचा संघ 308 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सुरुवातीलाच अडखळला. त्यांची अवस्था 3 बाद 17 अशी झाली होती. यानंतर शेवटपर्यंत आयर्लंडला या स्थितीतून सावरता आले नाही. भारताकडून गर्व सांगवान, अनिश्वर गौतम, कौशल तांबे यांनी प्रत्येकी दोन विकेटस् मिळवले.

तर, हंगर्गेकर, रविकुमार, विकी ओस्तवाल यांनी एक-एक विकेट घेत त्यांना साथ दिली. भारत ‘ब’ गटातील आपला शेवटचा सामना शनिवारी युगांडाविरुद्ध खेळणार आहे. धूल आणि राशीद शिवाय आराध्य यादव, वासू वत्स, मानव पारख आणि सिद्धार्थ यादव यांची कोरोना चाचणीदेखील पॉझिटिव्ह आली होती.

Back to top button