अंडर-१९ विश्वचषक : भारताची विजयी सलामी | पुढारी

अंडर-१९ विश्वचषक : भारताची विजयी सलामी

जॉर्जटाऊन ; वृत्तसंस्था : चार वेळच्या चॅम्पियन भारताने सर्वच विभागांत चांगली कामगिरी करत दक्षिण आफ्रिकेला 19 वर्षाखालील विश्वचषक (अंडर-१९ विश्वचषक) स्पर्धेत 45 धावांनी पराभूत केले आणि स्पर्धेच्या मोहिमेला विजयाने सुरुवात केली.

प्रोविडेन्स स्टेडियमवर झालेल्या लढतीत (अंडर-१९ विश्वचषक) दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. फलंदाजीस उतरलेल्या भारताने कर्णधार यश धुलच्या 82 धावांच्या खेळीच्या जोरावर 46.5 षटकांत 232 धावसंख्येपर्यंत मजल मारली. यानंतर स्पिनर विक्की ओस्तवाल (5/28) आणि जलदगती गोलंदाज राज बावा (4/47) यांनी चांगली गोलंदाजी केली आणि दक्षिण आफ्रिकन संघाला 45.4 षटकांत 187 धावसंख्येवर रोखले.

दक्षिण आफ्रिकेने 233 धावसंख्येचा पाठलाग करताना सलामी फलंदाज इटहान जॉन कनिंघम (शून्य) विकेट पहिल्याच षटकात गमावला. त्याला जलदगती गोलंदाज राजवर्धन हंगर्गेकरने बाद केले. यानंतर वेलेंटाइन किटाइम (25) व डेवाल्ड ब्रेविस (65) यांनी दुसर्‍या विकेटसाठी 58 धावांची भागीदारी रचली. ओस्तवालने किटाइमला बाद करत ही भागीदारी मोडीत काढली.

21 व्या षटकात ओस्तवालने जी.जे. मारी (आठ) याला बाद करत दक्षिण आफ्रिकेची अवस्था 3 बाद 83 अशी केली. यानंतर भारतीय गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेला सावरण्याची संधी दिली नाही. ब्रेविसला बाद केल्यानंतर इतर कोणत्याही फलंदाजाला चमक दाखवता आली नाही.

त्यापूर्वी भारतीय संघाने 11 धावांच्या आतच सलामी फलंदाज अंगक्रीश रघुवंशी (पाच) आणि हरनूर सिंह (एक) यांना गमावले. धुल आणि शेख राशिद (31) यांनी तिसर्‍या विकेटसाठी 71 धावांची भागीदारी रचत संघाला सावरले. धुलने आपल्या खेळीत 11 चौकार लगावले. निशांत सिंधूने देखील 25 चेंडूत 27 धावांची खेळी केली. राज बावा (13) आणि धुल बाद झाल्यानंतर कौशल तांबेने 35 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.

Back to top button