अ‍ॅशेस मालिका : इंग्लंडचा ४-० ने धुव्वा - पुढारी

अ‍ॅशेस मालिका : इंग्लंडचा ४-० ने धुव्वा

होबार्ट ; वृत्तसंस्था : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील अ‍ॅशेस मालिकेच्या पाचव्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 146 धावांनी विजय मिळवला. इंग्लंडला सामना जिंकण्यासाठी 271 धावांचे लक्ष्य होते. इंग्लंडला विजयासाठी चांगली संधी होती. पण, तिसर्‍याच दिवशी त्यांचा डाव फक्त 124 धावसंख्येवर आटोपला. या कसोटीतील विजयाने ऑस्ट्रेलियाने मालिका 4-0 अशी जिंकली. पहिल्या डावात शतक झळकावणार्‍या ट्रॅविस हेडची सामनावीर आणि मालिकावीर म्हणून निवड करण्यात आली.

आव्हानाचा पाठलाग करणार्‍या इंग्लंड संघाची सुरुवात चांगली झाली नाही. पहिल्या विकेटसाठी रोरी बर्न्स आणि जॅक क्राऊली यांनी 68 धावांची भागीदारी रचली. या भागीदारीला कॅमरुन ग्रीनने बर्न्सला (26) बाद करत मोडीत काढले. दोन षटकानंतर ग्रीनने डेविड मलानला (10) देखील माघारी धाडले. यानंतर इंग्लंडच्या कोणत्याही फलंदाजाला चमक दाखवता आली नाही.

क्राऊली (36), कर्णधार जो रूट (11), बेन स्टोक्स (5) आणि सॅम बिलिंग्स (1) हे देखील लवकर बाद झाले. ऑस्ट्रेलियन कर्णधार कमिन्स, स्कॉट बोलंड आणि कॅमरुन ग्रीन यांनी प्रत्येकी तीन-तीन विकेट मिळवले. तर मिचेल स्टार्कने एक विकेट आपल्या नावे केली.

त्यापूर्वी ऑस्ट्रेलियन संघाने तिसर्‍या दिवशी 3 बाद 37 धावसंख्येच्या पुढे खेळण्यास सुरुवात केली. अ‍ॅलेक्स कॅरीच्या (49) खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने दुसर्‍या डावात 155 धावसंख्येपर्यंत मजल मारली.

इंग्लंडकडून मार्क वूडने सहा विकेटस् घेत चमक दाखवली. त्याला क्रिस ब्रॉडने तीन विकेट मिळवत चांगली साथ दिली. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड दरम्यान खेळविण्यात आलेली ही 72 वी अ‍ॅशेस मालिका होती. कांगारूंनी 34 व्या वेळा ही मालिका जिंकला; तर सलग तिसर्‍यांदा जेतेपद मिळवले.

Back to top button