ऑलिम्पिक : खेळाडू १२५, कोण बनेगा चॅम्पियन? - पुढारी

ऑलिम्पिक : खेळाडू १२५, कोण बनेगा चॅम्पियन?

1, 1, 1, 1, 1, 1, 1, 3, 6, 2 ही कोण्या क्रिकेटपटूची धावसंख्या नाही, ही आहे गेल्या दहा ऑलिम्पिक स्पर्धेतील महाकाय लोकसंख्या असणार्‍या भारताची पदकसंख्या.

गत रियो स्पर्धेत टोकियो प्रमाणेच जम्बो पथक गेले होते. खेळाडू 120, पदके 2, क्रमवारी 67 ही आपली तुटपुंजी कामगिरी. आता टोकियोत काय इतिहास घडणार याकडेच भारतीय ऑलिम्पिक शौकिनांच्या नजरा खिळल्या आहेत.

मिशन टोकियो

मिशन टोकियोसाठी इतिहासातील सर्वात मोठे 125 खेळाडूंचे पथक रवाना झाले आहे. यश किती टक्के पदरी येणार. किमान 10 टक्के. म्हणजे 12 पदके आपण जिंकणार का. गत वेळीही भले मोठे पदक ब्राझीलच्या निळाशार समुद्र किनार्‍यावरील रियोत दाखल झाले होते.

मात्र, लंडन इतकेही आपण यशस्वी झालो नाहीत. गत रियोेत भारतीय क्रीडापटूंचा खेळ सुरू होताच सॅकमधील तिरंगा मी प्रेसबॉक्सच्या टेबल बाहेर झळकवीत असे. अर्धा तासातच यशाचा रंग बदलून गेलेला असायचा.

‘जय हिंद’चा नारा क्षीण होत जायचा आणि मीही हळूचपणे पुन्हा तिरंगा सॅकमध्ये ठेवत असे. स्पर्धेचा पहिला आठवडा इतका जड गेला की, सर्व भारतीय ऑलिम्पिक चाहत्यांचे चेहरे पहाण्यासारखे होते.

एकटा मायकल फ्लेप्स, उसेन बोल्ट भारतापेक्षा अधिक पदकांचा इतिहास घडवित होते. दुसरीकडे भारत एका पदकासाठी आसुरलेला होता.

नेमबाजीच्या पदकाने ऑलिम्पिक च्या रणांगणात जागतिक यशपूर्तीचा श्रीगणेशा होत असतो. रियोतही पहिले पदक 10 मीटर एअर रायफल पिस्तूल प्रकारात घोषित झाले.

गत बीजिंग आणि लंडन स्पर्धेत पहिल्याच दिवशी नेमबाजीत यश

गत बीजिंग आणि लंडन स्पर्धेत पहिल्याच दिवसापासून नेमबाजीतील यशामुळे भारताचे नाव झळकत पदक तक्त्यात राहिले. रियोत तब्बल 12 वर्षांनंतर नेमबाजांना रिकाम्या हाताने परतावे लागले.

घोर निराशेने भारताच्या ऑलिम्पिक मोहिमेची सुरुवात झाली होती. पुण्यापेक्षा लहान असणारे देश पदक तक्त्यात दिसत असताना महाकाय लोकसंख्येच्या आपल्या देशाच्या नावापुढे पराभव एके पराभव असेच पाढे लिहिले जात होते.

दोन अक्षरी पदक

आतापर्यंतच्या ऑलिम्पिक इतिहासातील भारताचे 120 क्रीडापटूंचे सर्वात जम्बो पथक रियोत दाखल केले होते.

मुष्ठियुद्ध, नेमबाजी, हॉकी, कुस्ती, बॅडमिंटन खेळात एकापेक्षा अधिक पदके आपले क्रीडावीर जिंकतील अशी आस होती. दोन अक्षरी पदकांचा म्हणजेच 10 पदकांची अपेक्षा असणार्‍या भारताला कशीबशी दोन पदके हाती आली.

स्पर्धेपूर्वी साक्षी मलिक आणि पी. व्ही. सिंधूचे नाव कोणीही संभाव्य यादीत घेतले नव्हते.

जिम्नॉस्टिक्सपटू दीपा कर्माकरचे नावही कोणाच्या मुखी नव्हते. अंडर डॉगप्रमाणे या तिघांनी देशाचा झेंडा फडकत ठेवला.

साक्षीने रिपेचस्च्या पराभवाच्या राखेतून कांस्यपदक फुलवले तर सिंधूने डार्क हॉर्स समजले गेलेेले चीन, जपानीज खेळाडूंचे नामोहरम करून रूपेरी इतिहास घडविला.

दीपाने तर अंतिम फेरीत धडक घेऊन चौथे स्थान पटकावले. ती जिम्नॉस्टिक्समधील पी. टी. उषा ठरली. पॉईंट चारने तिचे पदक हुकले. रियो स्पर्धा कुस्तीपटू नरसिंग यादवच्या डोपिंग प्रकरणामुळेही गाजली होती.

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतील सहभागातही आपण आघाडी घेतली आहे. 125 खेळाडूंचे भलेमाठे पथक जपानमध्ये सराव करीत आहे.

कोण बनेगा ऑलिम्पिक चॅम्पियन

पदक कोण जिंकणार? कोण बनेगा ऑलिम्पिक चॅम्पियन?, पी. व्ही. सिंधू, मेरी कोम दुहेरी पदकाचा इतिहास लिहिणार का? कुस्तीपटू बजरंग पुनिया, तिरंदाज दीपिकाकुमारी, वेटलिफ्टर मीराबाई चानू, कोल्हापूरची राही सरनोबत, तेजस्विनी सावंत आपल्या जागतिक पदकाच्या लौकिकाचा खेळ झळकविणार का?

टोकियोत 10 टक्के यश मिळण्याची शक्यता नसली तरी 8 ते 10 पदके भारताच्या नावापुढे झळकतील व दोन भारतीय खेळाडू सुवर्णपदके जिंकून टोकियोच्या ऑलिम्पिकमध्ये देशासाठी ऐतिहासिक झळाळी देतीलच.

संजय दुधाणे

Back to top button