टीम इंडिया चा सराव सामना आजपासून  | पुढारी

टीम इंडिया चा सराव सामना आजपासून 

ड्युरहॅम ; वृत्तसंस्था : विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली इंग्लंडमध्ये दाखल झालेल्या टीम इंडिया ची सुट्टी संपली असून, उद्यापासून कौंटी क्लब एकादश संघाविरुद्ध टीम इंडियाचा तीन दिवसीय सराव सामना खेळवला जाणार आहे.

इंग्लंडविरुद्ध 4 ऑगस्टपासून सुरू होणार्‍या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेची पूर्वतयारी म्हणून टीम इंडिया साठी दोन सराव सामन्यांचे आयोजन करण्यात बीसीसीआयला यश मिळाले आहे. त्याची सुरुवात उद्यापासून होत आहे.

ऋषभ पंतला मागच्या आठवड्यात कोरोना झाला होता अन् विलगीकरणानंतर पुन्हा त्याचा रिपोर्ट काढण्यात आला आहे. तो रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे आणि तो 22 तारखेला संघासोबत सराव करण्यास उतरेल. त्यामुळे तो पहिल्या सराव सामन्यात खेळणार नाही.

ऋषभ पंतच्या अनुपस्थितीत लोकेश राहुल यष्टींमागे दिसणार आहे. कारण, राखीव यष्टिरक्षक वृद्धिमान साहा हाही कोरोना पॉझिटिव्ह सदस्याच्या संपर्कात आल्यामुळे विलगीकरणात आहे. त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. परंतु, त्याला 24 जुलैपर्यंत विलगीकरणातच रहावे लागणार आहे. त्यामुळे सराव सामन्यात लोकेश यष्टिरक्षकाच्या भूमिकेत दिसेल.

सूत्रांनी सांगितले की, ‘ऋषभ पंतला पुन्हा तंदुरुस्ती मिळवण्यासाठी पुरेसा आराम दिला जाणार आहे. त्याच्यात आता आजारपणाची कोणतीच लक्षणे दिसत नाहीत. परंतु, पहिल्या कसोटीत खेळण्यापूर्वी त्याला सरावाची गरज भासणार आहे.

ऋषभसह वृद्धिमान साहा हाही पहिल्या कसोटीसाठी उपलब्ध असेल. मात्र, आता पहिल्या सराव सामन्यात लोकेश राहुल यष्टिरक्षण करेल.’

शुभमन गिलला दुखापतीमुळे इंग्लंड दौर्‍यावरून माघार घ्यावी लागली आहे. त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत रोहित शर्मासह सलामीला मयंक अग्रवाल अन् लोकेश राहुल ही नावे चर्चेत आहेत.

सराव सामन्यात लोकेश यष्टींमागे दिसणार असल्याने मयंक रोहितसह सलामीला खेळेल. त्यात चांगली कामगिरी केल्यास कसोटी मालिकेत त्याला संधी मिळू शकते.

अजिंक्य रहाणेचा फॉर्म हा चिंतेचा विषय बनला आहे, तो पुन्हा अपयशी ठरल्यास लोकेशचा मधल्या फळीसाठी विचार होऊ शकतो.

Back to top button