ऑलिम्पिक मध्ये तिसरा खेळाडू कोरोनाग्रस्त

टोकियो ; वृत्तसंस्था : चेक प्रजासत्ताकचा व्हॉलीबॉल खेळाडू ओंद्रेज पेरुसिच याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे टोकियो ऑलिम्पिक मध्ये सहभागी झालेल्या कोरोनाबाधित खेळाडूंची संख्या आता तीन झाली आहे.

यापूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या दोन फुटबॉलपटूंना कोरोनाने गाठले होते. याशिवाय इतर तिघांचा अहवालही कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये एक व्यक्ती खेळाशी संबंधित आहे, दुसरा ठेकेदार आहे, तर तिसरी व्यक्ती पत्रकार आहे.
चेक प्रजासत्ताकच्या ऑलिम्पिक संघाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून याची माहिती देण्यात आली आहे. त्यांनी म्हटले आहे की, सर्व प्रकारची दक्षता घेतल्यानंतरही व्हॉलीबॉलपटू ओंद्रेज पेरुसिच हा कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे.

त्याच्यामध्ये कोणतीही लक्षणे दिसत नाहीत, तरीही त्याला अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. पथकाचे प्रमुख मार्टिन यांनी सांगितले की, ओंद्रेजचे सँम्पल रविवारी घेण्यात आले होते.

ऑलिम्पिक क्रीडा नगरीतील तीन खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याबरोबरच कोरोनाची तीन आणखीन प्रकरणे समोर आली; पण यामध्ये कोणत्याही खेळाडूचा समावेश नाही.

जी प्रकरणे समोर आली आहेत त्यामध्ये खेळाशी संबंधित एक व्यक्ती आहे. याशिवाय एक ठेकेदार आणि एका पत्रकाराला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. या सर्वांना 14 दिवसांसाठी आयसोलेशनमध्ये पाठविण्यात आले आहे.

आयोजन समितीने कोरोनाच्या दैनिक यादीत या तीन प्रकरणांची माहिती दिली. त्यामुळे स्पर्धेशी संबंधित कोरोना बाधितांची संख्या आता 59 झाली आहे.

रविवारी पहिल्यांदा क्रीडा नगरीत राहत असलेल्या दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाली होती. हे दोन्ही दक्षिण आफ्रिकन फुटबॉल संघाचे खेळाडू आहेत. आयोजकांनी याची माहिती दिली नाही. मात्र, दक्षिण आफ्रिकन फुटबॉल संघटनेने प्रसिद्धी पत्रकाद्वारे याबाबत माहिती जाहीर केली आहे.

Back to top button