कसोटी मालिका : भारतीय संघासाठी यंदाचा तिळगुळ कडूच - पुढारी

कसोटी मालिका : भारतीय संघासाठी यंदाचा तिळगुळ कडूच

पुढारी ऑनलाईन डेस्क : केपटाऊनमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तिसऱ्या आणि निर्णायक कसोटी सामन्याची सांगता दक्षिण आफ्रिकेच्या विजयाने झाली. तब्बल ७ गडी राखून भारतावर मात करत दक्षिण आफ्रिकेने ही कसोटी मालिका २-१ फरकाने जिंकली. यंदाच्या कसोटी मालिकेत भारतीय संघ अपयशी ठरल्याने कसोटी मालिका न जिंकण्याची परंपरा कायम राहिली.

१९९२-९३ पासून सुरू झालेली ही कसोटी मालिका आजपर्यंत जिंकलेलो नाही. गेल्या ३० वर्षांत भारताने दक्षिण आफ्रिकेत एकूण २३ कसोटी सामने खेळले असून आजपर्यंत त्यातील केवळ तीनचं सामने जिंकलेले आहेत. १९९२-९३ मध्ये झालेल्या पहिल्यावहिल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात मोहम्मद अझरुद्दीनने भारताचं नेतृत्व केलं होतं. १९९६-९७ मध्ये सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखाली ही भारत फारशी चमक दाखवू शकला नव्हता.

२००१-०२ मध्ये सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेत गेलेल्या भारतीय संघाच्या पदरी निराशाच पडली. २००६-०७ च्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात भारताने राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदाच कसोटी सामना जिंकण्याची कमाल केली. पण मालिका विजय मात्र दूरच राहिला.

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली २०१०-११ ची कसोटी मालिका अनिर्णित राखण्यात भारताला यश आलं. हीच काय ती भारताची आजवरची दक्षिण आफ्रिकेतील सर्वोत्तम कामगिरी! पुढे २०१३-१४ मध्ये मात्र धोनी आपल्या कर्णधारपदाचा करिश्मा दाखवू शकला नाही आणि भारत पुन्हा एकदा अपयशी ठरला.

२०२१-२२च्या कसोटी मालिकेची सुरुवात भारताने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली केली आणि पहिलाच सामना मोठ्या फरकाने जिंकला. पण, पुढच्या दोन्ही सामन्यांत दक्षिण आफ्रिकेवर वर्चस्व मिळविण्यात भारत सपशेल अपयशी ठरला. दुसऱ्या सामन्यात कर्णधार लोकेश राहुल तर तिसऱ्या सामन्यात कर्णधार विराट कोहली भारताला विजयपथावर नेऊ शकले नाहीत. गेल्या तीस वर्षांत झालेल्या सहांपैकी एकाही कसोटी मालिकेत भारताला विजेतेपद मिळालेलं नाही. यावर्षीची ही सातवी मालिकाही जिंकता न आल्याने भारताला यंदाचा तिळगुळ कडूच लागेल.

Back to top button