U-19 World Cup 2022 : १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेचा थरार | पुढारी

U-19 World Cup 2022 : १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेचा थरार

जॉर्जटाऊन ; वृत्तसंस्था : वेस्ट इंडिजमध्ये शुक्रवारपासून सुरू होणार्‍या 19 वर्षांखालील विश्वचषक (U-19 World Cup 2022 ) स्पर्धेत भविष्यातील क्रिकेटपटूंना चमक दाखवण्याची संधी मिळेल. चारवेळा जेतेपद मिळवणारा भारतीय संघ यावेळीदेखील जेतेपदाचा प्रबळ दावेदार असेल. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदा कॅरेबियनमध्ये होणार्‍या या स्पर्धेत 16 संघांची चार गटांत विभागणी करण्यात आली आहे. भारत ‘ब’ गटात असून, ऑस्ट्रेलिया ‘ड’ गटात आहे.

दोन वर्षांपूर्वी भारताला पराभूत करीत जेतेपद मिळवणारा बांगला देश संघ ‘अ’ गटात आहे. दोनवेळचा विजेता पाकिस्तान आणि अफगाणिस्तान संघ ‘क’ गटात आहेत. व्हिसा संबंधित अडचणीमुळे अफगाणिस्तान संघ उशिरा दाखल झाला आणि त्यामुळे त्यांना सराव सामने खेळता आले नाहीत. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ उपांत्यपूर्व फेरी गाठतील.

स्पर्धेत अजूनतरी जैव सुरक्षित वातावरणाचे (बायो बबल) उल्लंघन झालेले दिसत नाही. मात्र, पाकिस्तान आणि झिम्बाब्वे संघांत कोरोना संक्रमणाची प्रकरणे समोर आली आहेत. न्यूझीलंड संघाने आयसोलेशन नियमांमुळे स्पर्धेतून माघार घेतली. त्यामुळे स्कॉटलंड संघ ही स्पर्धा खेळणार आहे. यजमान वेस्ट इंडिज समोर पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाचे आव्हान असेल तर स्कॉटलंडचा सामना श्रीलंकेशी होईल. भारताला पहिला सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध गयानामध्ये खेळायचा आहे.

भारताचे सामने (U-19 World Cup 2022 )

दि. 15 जानेवारी : भारत वि. द. आफ्रिका
दि. 19 जानेवारी : भारत वि. आयर्लंड
दि. 22 जानेवारी: भारत वि. युगांडा
सर्व सामने संध्याकाळी 7.30 वा. सुरू होतील.

हे संघ जेतेपदाचे प्रबळ दावेदार (U-19 World Cup 2022 )

भारत : विक्रमी चारवेळा जेतेपद मिळवणारा भारतीय संघ जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. भारतीय संघाने आशियाई कप स्पर्धेचे जेतेपद मिळवून थेट वेस्ट इंडिजमध्ये दाखल झाला आहे. पाच दिवसांच्या आयसोलेशननंतर यश धूलच्या नेतृत्वाखालील संघाने सराव सामन्यात ऑस्ट्रेलियाला नऊ विकेटस्ने पराभूत केले. सलामी फलंदाज हरनूर सिंह, दिल्लीचा फलंदाज आणि कर्णधार यश, शेख रशीद आणि जलदगती गोलंदाज राजवर्धन हंगर्गेकर यांकडून संघाला अपेक्षा आहेत.

ऑस्ट्रेलिया : तीनवेळा जेतेपद मिळवणारा ऑस्ट्रेलियन संघ दुसरा प्रबळ दावेदार आहे. 2010 साली त्यांनी शेवटचे जेतेपद मिळवले होते. तेव्हा संघात मिचेल मार्श, अ‍ॅडम झम्पा आणि जोश हेझलवूड होते. यावेळी अष्टपैलू खेळाडू कूपर कोनोली संघाचा कर्णधार आहे आणि 2020 मध्ये त्याने वेस्ट इंडिज विरुद्ध एका ‘प्ले ऑफ’ लढतीत 53 चेंडूंत 64 धावा केल्या होत्या.

बांगला देश : 2020 मध्ये बांगला देशने जेतेपद मिळवत इतिहास रचला होता आणि त्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न त्यांचा असणार आहे. कर्णधार रकीबुल हसन जेतेपद मिळवणार्‍या संघाचा सदस्य होता. गेल्या महिन्यात आशिया कप उपांत्य फेरीत भारताने बांगला देशला नमविले होते.

पाकिस्तान : पाचवेळा अंतिम फेरी गाठणार्‍या पाकिस्तानने 2004 आणि 2006 मध्ये जेतेपद मिळवले होते. शाहिन शाह आफ्रिदी 2018 च्या 19 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेतून पुढे आला. कासिम अक्रमच्या नेतृत्वाखाली संघाला माजी फलंदाज एजाज अहमदचे मार्गदर्शन मिळणार आहे.

इंग्लंड : इंग्लंडने 24 वर्षांपूर्वी एकमात्र 19 वर्षांखालील स्पर्धेचे जेतेपद मिळवले होते. तर, 2014 मध्ये ते तिसर्‍या स्थानी होते. गेल्या वेळी पहिल्या फेरीच्या पुढे त्यांना जाता आले नव्हते. यावर्षी कर्णधार टॉम प्रेस्टकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.

Back to top button