IPL 2022 : महाराष्ट्रात संपूर्ण आयपीएल आयोजनाबाबत लवकरच निर्णय? | पुढारी

IPL 2022 : महाराष्ट्रात संपूर्ण आयपीएल आयोजनाबाबत लवकरच निर्णय?

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रात ‘आयपीएल-2022’चे (IPL 2022) संपूर्ण सत्र आयोजित करण्याबाबत आगामी दहा दिवसांत चित्र स्पष्ट होण्याची शक्यता असल्याची माहिती मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या विश्वसनीय सूत्रांनी दै. ‘पुढारी’ला दिली. हेमांग अमीन (बीसीसीआयचे अंतरिम सीईओ आणि आयपीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी) यांनी एमसीएच्या सर्वोच्च परिषदेच्या बैठकीवेळी यासंदर्भात विजय पाटील (मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष) यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर काही दिवसांनी अमीन आणि पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. बीसीसीआयच्या प्रस्तावाला पवारांनी हिरवा कंदील दाखवला असल्याचे समजते.

या आठवड्यात किंवा पुढील 10 दिवसांमध्ये शरद पवार, बीसीसीआय आणि एमसीएचे अधिकारी हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राज्याचे मुख्य सचिव यांची भेट घेऊन यासंदर्भात आवश्यक परवानगीची व्यवस्था करणार असल्याचे समजते. आयपीएल जैवसुरक्षित वातावरणात खेळविले जाईल आणि खेळाडू व अधिकार्‍यांची वारंवार ‘कोव्हिड-19’ चाचणी घेतली जाईल, असे सूत्रांनी सांगितले.

राज्यात या ठिकाणी होऊ शकतात सामने (IPL 2022)

या प्रतिष्ठित लीगसाठी मुंबईतील वानखेडे स्टेडियम, ब्रेबॉर्न स्टेडियम (सीसीआय), नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियम (एएफसी महिला आशियाई फुटबॉल चषक स्पर्धेचे ठिकाण) आणि पुण्याजवळील गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम या ठिकाणी सामने होऊ शकतात. या सर्व ठिकाणी यापूर्वी आयपीएलचे सामने खेळविले गेले आहेत. तसेच, येथे खेळाडूंसाठी सुविधादेखील चांगल्या दर्जाच्या आहेत. संपूर्ण लीग मुंबईतील तीन स्टेडियम आणि पुण्यातील मैदानापुरती मर्यादित ठेवल्याने स्पर्धेदरम्यान हवाई प्रवासाची अडचण दूर करण्यास मदत मिळणार आहे, असे सूत्राने सांगितले.

कोरोना प्रादुर्भावाचे असेल आव्हान

आयपीएल स्पर्धा आयोजित करण्यास अद्याप बराच अवधी बाकी असला तरी सध्या महाराष्ट्रासह मुंबईत कोरोना रुग्णवाढ होताना दिसत आहे. गेल्या हंगामात भारतात आयपीएलची सुरुवात झाली; पण खेळाडूंना कोरोना प्रादुर्भाव झाल्याने स्पर्धा स्थगित करावी लागली आणि नंतर उर्वरित सामने हे यूएईमध्ये खेळविण्यात आले. त्यामुळे आयोजक विचार करूनच पुढचे पाऊल उचलतील.

राज्य शासनाकडून क्रीडा क्षेत्रासाठी नियमावली (IPL 2022)

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य शासनाकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे. नवीन नियमानुसार राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा सोडून इतर कोणत्याही स्पर्धेचे आयोजन हे करता येणार नाही. या स्पर्धांसाठी वेगळी नियमावली असेल आणि त्याचे काटेकोरपणे पालन केले जाणे गरजेचे आहे. या महिन्यात राज्यात दोन आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन होणार आहे.

Back to top button