SA vs IND 3rd test : बुमराहसमोर द. आफ्रिका शरण | पुढारी

SA vs IND 3rd test : बुमराहसमोर द. आफ्रिका शरण

केपटाऊन ; वृत्तसंस्था : वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (SA vs IND 3rd test ) (42 धावांत 5 विकेटस्), उमेश यादव व मोहम्मद शमी (प्रत्येकी 2 विकेटस्) यांच्या भेदक गोलंदाजीच्या बळावर भारताने तिसर्‍या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पहिल्या डावात 210 धावांवर रोखले. यामुळे भारताने पहिल्या डावात 13 धावांची आघाडी घेतली आहे.

भारताच्या पहिल्या डावातील सर्वबाद 223 धावांना उत्तर देताना दक्षिण आफ्रिकेने मंगळवारी पहिल्या दिवसाअखेर 1 बाद 17 धावा केल्या होत्या. अ‍ॅडम मार्कराम व केशव महाराज यांनी दुसर्‍या दिवशी पहिल्या डावास पुढे सुरुवात केली. आजच्या पहिल्या षटकातील दुसर्‍या चेंडूवर बुमराहने मार्करामचा 8 धावांवर त्रिफळा उद्ध्वस्त केला. त्यानंतर उमेश यादवने केशव महाराजलाही 25 धावांवर त्रिफळाबाद करून भारताला तिसरे यश मिळवून दिले.

उपहारावेळी खेळ थांबला तेव्हा द. आफ्रिकेने 3 बाद 100 धावांपर्यंत मजल मारली होती. यावेळी पीटरसन 40 तर डुसेन 17 धावांवर खेळत होते.उपहारानंतर उमेश यादवने डुसेनला कोहलीकरवी झेलबाद केले. यामुळे द. आफ्रिकेची 4 बाद 112 अशी स्थिती झाली. डुसेनने 21 धावांचे योगदान दिले. त्यानंतर पीटरसनने 101 चेंडूंत 8 चौकारांच्या मदतीने अर्धशतक पूर्ण केले. 51.3 षटकांत द. आफ्रिकेचे दीडशतक पूर्ण झाले.

पीटरसन व बवुमा ही जोडी डोकेदुखी ठरणार असे वाटत असतानाच शमी संघाच्या मदतीला धावून आला. त्याने जम बसलेल्या बवुमाला विराटकडे झेल देण्यास भाग पाडले. बवुमाने 52 चेंडूंत 4 चौकारांसह 28 धावा काढल्या.

शमीने पुढच्याच चेंडूवर वर्नेनला पंतकरवी शून्यावर झेलबाद करून द. आफ्रिकेची 6 बाद 159 अशी स्थिती केली. पीटरसनला साथ देण्यासाठी आलेल्या जेन्सेनचा 7 धावांवर बुमराहने त्रिफळा उडविला.

यामुळे द. आफ्रिकेची 7 बाद 176 अशी स्थिती झाली. चहापानानंतर बुमराहने पीटरसनला (72) पुजाराकरवी झेलबाद केले. त्यानंतर रबाडा व ऑलिव्हर यांनी नवव्या विकेटसाठी 21 धावांची भागीदारी केली. शार्दुलने रबाडाला (15) झेलबाद केले. शेवटी बुमराहने एन्गिडीला (3) अश्विनकडे झेल देण्यास भाग पाडून दक्षिण आफ्रिकेचा डाव 210 धावांवर संपुष्टात आणला. तर, ऑलिव्हर 10 धावांवर नाबाद राहिला. भारताच्या वतीने बुमराहने सर्वाधिक पाच विकेटस् घेतल्या.

भारत प. डाव : 223 धावा. (SA vs IND 3rd test)

द. आफ्रिका प. डाव : एल्गर झे. पुजारा गो. बुमराह 3, मार्करम त्रिफळाबाद गो. बुमराह 8, केशव महाराज त्रिफळाबाद गो. यादव 25, पीटरसन झे. पुजारा गो. बुमराह 72, डुसेन झे. कोहली गो. यादव 21, बवुमा झे. कोहली गो. शमी 28, वर्नेन झे. पंत गो. शमी 0, मार्को जेन्सेन त्रिफळाबाद गो. बुमराह 7, रबाडा झे. बुमराह गो. शार्दुल 15, ऑलिव्हर नाबाद 10, एन्गिडी झे. अश्विन गो. बुमराह 3. अवांतर 18, एकूण 76.3 षटकांत सर्वबाद 210.

विकेट : 1-10, 2-17, 3-45, 4-11, 5-159, 6-159, 7-176, 8/179, 9/200, 10/210, गोलंदाजी : बुमराह 23.3-8-42-5, यादव 16-3-64-2, शमी 16-4-39-2, ठाकूर 12-2-37-1, अश्विन 9-3-15-0.

Back to top button