विराट कोहली म्हणाला, माझे चुकतेय; पण धोनीच्या सल्ल्यानुसार मार्ग काढू | पुढारी

विराट कोहली म्हणाला, माझे चुकतेय; पण धोनीच्या सल्ल्यानुसार मार्ग काढू

केपटाऊन : चुका होणे हा माणसाचा स्वभाव आहे. परंतु, एक चूक वारंवार होणे चांगले नाही. माझ्याबाबतीत सध्या तेच होत आहे. एकच चूक सारखी-सारखी घडत आहे, याची कबुली भारताचा कर्णधार विराट कोहली याने दिली; पण महेंद्रसिंग धोनीने दिलेला सल्ला लक्षात ठेवून यावर मार्ग काढू, असा विश्वासही कोहलीने व्यक्त केला. सोमवारी केपटाऊन कसोटीपूर्वी विराट कोहली पत्रकार परिषदेत बोलत होता. कोहली मागील काही सामन्यांपासून बाहेर जाणार्‍या चेंडूशी छेडखानी करताना विकेट फेकतो आहे.

यावरून कोहलीवर टीकाही होते. यावरही त्याने भाष्य केले. तो म्हणाला की, ‘मी नेहमी देशासाठी खेळतो आणि याचा मला अभिमान आहे. कधी कधी काही गोष्टी तुम्हाला हव्या तशा होत नाहीत. वर्षभरापासून माझ्या बाबतीतही तेच होत आहे. एम. एस. धोनीने एकदा मला सांगितले होते की, एकच चूक करताना 7-8 महिन्यांचे अंतर असायला हवे. ही गोष्ट लक्षात ठेवली तर तुम्ही खूप काळ खेळू शकता. यावेळी कोहलीने यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतची पाठराखण केली.

पंत शॉट सिलेक्शनवरून चर्चेत आहे. चुकीचा फटका मारून तो नाहक आपली विकेट गमावतो, हा विषय नेहमी चर्चेचा ठरतो. यावरच कोहलीने त्याची पाठराखण केली.’ तो म्हणाला की, ‘आम्ही सुरुवातीला पंतसारख्या चुका वारंवार केल्या आहेत. तोही चुकांमधून शिकत जाईल. माझ्या संघासाठी मी योगदान देऊ शकतो, याचा मला सार्थ अभिमान आहे, त्यामुळेच दीर्घ काळ मी चांगली कामगिरी करू शकलो.

मागील काही वर्षांत मी संघाच्या महत्त्वाच्या क्षणांचा साक्षीदार होतो. जेव्हा मी कर्णधारपद हाती घेतले. तेव्हा आम्ही जागतिक क्रमवारीत 7 व्या क्रमांकावर होतो. आता मागील 4-5 वर्षांत आम्ही नंबर वन वर आहोत. हे सांघिक यश आहे. मला असे वाटते की मला कुणाला काही सिद्ध करून दाखवण्याची गरज नाही,’ असेही विराट म्हणाला.

Back to top button