मल्लांची उपेक्षा : मानधनापेक्षा खुराकाचा खर्च अधिक | पुढारी

मल्लांची उपेक्षा : मानधनापेक्षा खुराकाचा खर्च अधिक

पुणे : सुनील जगताप

शासनाच्या क्रीडा विभागाच्या वतीने ग्रीकोरोमन, फ्रीस्टाईल, महिला कुस्तीगीर आणि उदयोन्मुख कुस्तीपटूंसाठी मानधन योजना जाहीर करण्यात आली आहे. कुस्तीगीरांना देण्यात येणारे वार्षिक 60 हजार रुपयांचे मानधन अल्प असून सुवर्णपदक विजेत्यांना कमीत कमी 3 लाख रुपयांपर्यंत मानधन मिळणे अपेक्षित असल्याची भावना कुस्ती क्षेत्रातील मान्यवरांनी ‘पुढारी’शी बोलताना व्यक्त केली.

शासनाच्या वतीने फ्रीस्टाईल माती आणि गादी विभागातील कुस्तीगीरांना वजनी गटाप्रमाणे 60, 55 आणि 50 हजार रुपये, उदयोन्मुख कुस्तीगीरांना 50, 36 आणि 24 हजार रुपये, ग्रीकोरोमन गटातील कुस्तीगीरांना 60, 50 आणि 36 हजार रुपयांचे मानधन व महिला कुस्तीगीरांना 60, 50 आणि 36 हजार रुपये वार्षिक मानधन देण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय घेत असताना यापूर्वी सहा क्रमांकांना देण्यात येणारे मानधन रद्द करून केवळ पहिल्या चार क्रमांकांनाच दिले जाणार आहे. यासाठी पूर्वी 2 कोटी रुपयांचा खर्च येत होता. या नव्या निर्णयामुळे केवळ 1 कोटी 60 लाख रुपयांचा निधी खर्च होणार असून 40 लाख रुपयांचे खेळाडूंचे नुकसान झालेले आहे. वास्तविक पाहता सुवर्णपदक विजेत्या मल्लाला कमीत कमी 3 लाख रुपयांचे वार्षिक मानधन मिळणे अपेक्षित आहे. सर्वसाधारण मल्लाला एका महिन्याला 30 हजारांपर्यंत खुराकाचा खर्च येत असतो. चांगल्या मल्लाला 50 हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. खुराकासाठी महत्त्वाचे असलेल्या बदामाच्या किमती वाढल्या असून सर्वसाधारण मल्ल महिन्याला चार किलो व चांगला मल्ल महिन्याला सहा ते सात किलो बदाम खात असतो. त्यामुळे शासनाने दिलेले हे मानधन तुटपुंजे असून त्यामध्ये वाढ करावी, अशी मागणी कुस्ती क्षेत्रातून होत आहे. 

खुराकासाठी लागणार्‍या पदार्थांच्या किमती

मटण : 700 ते 800 रुपये किलो 

दूध : 70 ते 80 रुपये लिटर

तूप : 700 ते 800 रुपये किलो

बदाम : 1000 रुपये किलो

नव्या निर्णयाने खेळाडूंच्या तोंडाला पाने पुसली आहेत. वर्षाला 60 हजार रुपयांमध्ये मल्लाच्या दुधाचाही खर्च भागविणे शक्य होणार नाही. शासनाने चौथ्या क्रमांकापर्यंत न देता सहाव्या क्रमांकापर्यंत मानधन देणे गरजेचे आहे. शासनाने मानधनासाठीच्या निधीत दोन कोटी रुपयांवरून 1 कोटी 60 लाख रुपयांपर्यंत कपात केली आहे. सुवर्णपदक विजेत्याला 60 हजार नव्हे, तर कमीत कमी 3 लाख रुपयांपर्यंत मानधन शासनाकडून मिळणे गरजेचे आहे. 
– काका पवार (अर्जुन पुरस्कारप्राप्त कुस्तीपटू)


ग्रामीण भागातील मल्ल तालमीत जाऊन कसरत करीत असतात. मानधनामुळे तरी त्यांच्या खुराकाचा काही प्रमाणात प्रश्न मिटला असता. परंतु शासनाकडून तेच रद्द करण्यात आले आहे. यासंदर्भात ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा करणार असून मानधन वाढविण्यासाठी आगामी काळात प्रयत्न करणार आहे.
बाळासाहेब लांडगे, सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद

 

Back to top button