मे अखेरीस प्रकल्पांतील पाणीसाठा वाढला | पुढारी

मे अखेरीस प्रकल्पांतील पाणीसाठा वाढला

आजरा : ज्योतिप्रसाद सावंत 

मे महिन्याच्या दुसर्‍या पंधरवड्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे तालुक्यातील चित्री प्रकल्पासह छोट्या लघू पाटबंधारे तलावांमधील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. यावर्षी दि. 31 मेअखेर 10 ते 15 टक्क्यांनी पाणीसाठ्यात वाढ झाल्याने संभाव्य पूरस्थिती टाळण्यासाठी चित्री प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग करणे गरजेचे आहे. 

1886 द. ल. घ. फू. इतकी साठवणूक क्षमता असणार्‍या चित्री प्रकल्पामध्ये यावर्षी मेअखेर 711 द. ल. घ. फू. (37 टक्के) इतका पाणीसाठा आहे. गतवर्षी हाच पाणीसाठा 461 द. ल. घ. फू. (24 टक्के) इतका होता. चित्री प्रकल्पातील सद्यस्थितीचा पाणीसाठा विचारात घेतल्यास मान्सून सुरू होण्यापूर्वीच सुमारे 13 टक्के इतकी पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. मान्सूनच्या प्रारंभी 25 टक्के इतका साठा राहिल्यास पूरस्थितीवर नियंत्रण येणे शक्य होते. शेतकर्‍यांनी मागणी केली अथवा केली नाही, तरी पावसाचा अंदाज घेऊन सध्याचा पाणीसाठा कमी करणे आवश्यक आहे. त्याद़ृष्टीने पाटबंधारे विभागाच्या हालचाली सुरू आहेत. याबाबत वरिष्ठांच्या आदेशाच्या प्रतीक्षेत अधिकारीवर्ग आहे. 

धनगरवाडी लघू पाटबंधारे तलावात 15 द. ल. घ. फू. इतका पाणीसाठा गतवर्षी मेअखेर होता. यावर्षी मात्र हाच पाणीसाठा 37 द. ल. घ. फू. इतका आहे. 23 टक्के जादा पाणीसाठा सध्या धनगरवाडीत आहे. एरंडोळ लघू पाटबंधारे तलावाची अवस्थाही फारशी वेगळी नाही. 

गतवर्षी 62 द. ल. घ. फू. इतका पाणीसाठा असणार्‍या या तलावात यावर्षी 103 द. ल. घ. फू. इतका पाणीसाठा आहे. या प्रकल्पातही 27 टक्के जादाचा पाणीसाठा आहे. एकूण परिस्थिती पाहता यावर्षीचा पावसाळा शेतकर्‍यांच्या द़ृष्टीने समाधानकारक राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

पाटबंधारे विभागाची दमछाक

दि. 15 व 16 मे रोजी झालेल्या विक्रमी व अनपेक्षित पावसामुळे मे महिन्यातच हिरण्यकेशी नदीला पाणी आल्याने उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर निर्माण होणारी पाणी समस्या विचारात घेऊन पाटबंधारे विभागाने ठिकठिकाणच्या बंधार्‍यांमध्ये बरगे घालून पाणी अडविले होते. नदीतील पाणी तब्बल 25 ते 30 दिवस आधीच प्रवाहित झाल्याने या पाण्यातून मार्ग काढत बरगे काढताना पाटबंधारे विभागाची चांगलीच दमछाक झाली. 

Back to top button