बायको प्रेग्नंट आहे... इंजेक्शनसाठी कुत्र्याला पुण्याला न्यायचंय

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा व आंतरराज्य प्रवेशाला मनाई करण्यात आली असली तरी काही अत्यावश्यक कारणांसाठीच सवलत दिली आहे. त्यात मृत्यू, विवाह आणि औषधांचा अंतर्भाव आहे. मात्र, ऑनलाईन पाससाठी देण्यात येणार्या कारणांमुळे सायबर सेलच्या अधिकार्यांना हसावे की रडावे हेच कळेनासे झाले आहे.
लग्नानंतर हनीमूनला जायचं आहे… प्रेग्नंट बायकोची बाळंतपणासाठी माहेरी रवानगी करायचीय… इंजेक्शनसाठी कुत्र्याला पुण्याला न्यायचं आहे… जवळचे नातेवाईक वारले आहेत… या कारणांसोबतच मृत व्यक्तीशी काडीमात्र संबंध नसला तरी अनेकजण बोगस कागदपत्रे जोडत असल्याने सेलचे अधिकारी, कर्मचारी चक्रावले आहेत. दैनंदिन कामापेक्षा अफलातून कारणांची डोकेदुखी वाढली आहे.
सध्या जिल्ह्यात प्रवेश करणार्या सातही प्रमुख मार्गांवर रात्रंदिवस गस्ती पथके तैनात करण्यात आली आहेत. ऑनलाईन पासशिवाय प्रवेश करण्यास मनाई करण्यात येत आहे. सोमवार (दि.1) पासून जिल्ह्याच्या सीमा कडक करण्यात आल्या आहेत जिल्ह्यातून बाहेरगावी जाणार्या इच्छुकांची संख्या वाढली आहे. सेलकडे रोज दोन हजारांवर अर्ज येत आहेत. त्यातील कारणेही थक्क करणारी असतात. नवरोबाकडून हनीमूनसाठी पासची मागणी केली जात आहे. हे प्रमाण 10 ते 15 टक्क्यांवर आहे. प्रेग्नंट बायको, पण प्रवासासाठी सहा-सात जणांच्या नावांची यादी…
मृत्यूचे कारण सांगितले की पास मिळतो. हे सर्वश्रुत झाल्याने आडनावाचा फायदा घेत मृत व्यक्तीशी काडीमात्र संबंध नसलेले लोकही तशी कागदपत्रे जोडून ऑनलाईन पास मागत आहेत. एका बहाद्दराने तर कुत्र्याच्या इंजेक्शनसाठी पुण्याला जायचे कारण सांगून दाम्पत्यासह मुला, मुलींची यादी जोडली आहे.
मागणी अर्ज 67,502, परवाना 9,604 जणांना
जिल्हा व आंतरराज्य प्रवेश मनाईमुळे सध्या ई-पास मागणीची संख्या वाढली आहे. रोज सरासरी 1800 ते 2000 अर्ज दाखल होत आहेत. कागदपत्रांतील कारणांची खात्री करूनच प्रक्रिया राबविली जात आहे.
23 एप्रिल ते 2 जून या काळात 67 हजार 502 अर्ज दाखल झाले आहेत. त्यापैकी 9 हजार 604 जणांना ऑनलाईन प्रवेशासाठी मंजुरी देण्यात आली. 57 हजार 832 अर्ज फेटाळण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांनी सांगितले.
मुंबई, पुण्यासाठी 70 टक्क्यांवर इच्छुक
कोल्हापुरातून मुंबई, पुण्याला जाणार्या इच्छुकांची संख्या 65 ते 70 टक्क्यांवर आहे. साखरपुडा असताना लग्नाचे कारण दाखवून ऑनलाईन पाससाठी प्रयत्न केले जात आहेत. दूरध्वनी, मोबाईल संपर्क साधून कारणांची खात्री केली जाते. प्रसंगी स्थानिक पोलिस यंत्रणेचीही मदत घेतली जाते. चौकशीअंती कारण स्पष्ट होते. माहिती खरी असेल तर ऑनलाईन अर्ज तत्काळ मंजूर करण्यात येतो, असेही कंकाळ म्हणाले.