तर कोल्हापूर जिल्हा तिसर्‍या टप्प्यात येईल | पुढारी

तर कोल्हापूर जिल्हा तिसर्‍या टप्प्यात येईल

कोल्हापूर : सचिन टिपकुर्ले 

अन्य जिल्ह्यांतील कोरोनाबाधित रुग्णांचे कोल्हापूर जिल्ह्यात उपचार घेण्याचे वाढते प्रमाण, शासकीय प्रयोगशाळेच्या तुलनेत खासगी प्रयोगशाळेतील एकूण चाचणी अहवालातील पॉझिटिव्हिटीचे प्रमाण यामुळे कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश अनलॉकच्या चौथ्या टप्प्यात झाला आहे. जिल्हा व शहराच्या लोकसंख्येचा स्वतंत्र  विचार करायला हवा. तसेच पॉझिटिव्हिटी दर हा 10 टक्क्यांच्या आत हवा. तरच कोल्हापूरचा समावेशही तिसर्‍या टप्प्यात करणे शक्य आहे. 

कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश चौथ्या टप्प्यात केला आहे.  शासनाने ज्या शहराची लोकसंख्या दहा लाखांच्या वर आहे, अशा  शहरातील बाधित प्रमाण व जिल्ह्यातील प्रमाण अशी स्वतंत्र वर्गवारी केली आहे.  सोलापूर शहराची लोकसंख्या दहा लाखांवर आहे. शहर व जिल्ह्याची विभागणी झाल्यामुळे बाधित रुग्णांचे प्रमाण कमी झाले आहे.  कोल्हापूर शहराची लोकसंख्या साडेपाच लाख आहे. शासनाने दहा लाखांऐवजी शहराच्या लोकसंख्येची मर्यादा  पाच लाख केल्यास कोल्हापूर शहराचा व जिल्ह्याच्या बाधिताच्या प्रमाणाची टक्केवारी दहाच्या आत येणार आहे. त्यामुळे शहर व जिल्हा तिसर्‍या टप्प्यात आल्यास कोल्हापूर जिल्ह्यातील निर्बंध काही प्रमाणात कमी होणार आहेत. 

पॉझिटिव्हिटी रेट व मृत्यू प्रमाणात अन्य जिल्ह्यांचाही समावेश आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आजपर्यंत अन्य राज्य व जिल्ह्यांतील आठ हजार रुग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत. उपचार घेणार्‍यांची टक्केवारी दहा टक्क्यांच्या आसपास आहे. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या 3 हजार 887 आहे. यापैकी अन्य जिल्हे व राज्यातील 474 रुग्णांचा कोल्हापुरात मृत्यू झाला आहे. याचा फटका कोल्हापूर जिल्हा अनलॉक होण्याला बसला आहे.  कोरोना चाचणी करणार्‍या खासगी प्रयोगशाळेतील कोरोनाबाधितांचे प्रमाण 25 ते 35 टक्के आहे. शासकीय प्रयोगशाळेत हे प्रमाण कमी आहे. यामागची कारणे प्रशासनाने शोधली तर कोल्हापूरचा पॉझीटीव्हीटी रेट कमी येण्याची शक्यता आहे.

…असा आहे निकष

जिल्ह्यातील लॉकडाऊनचे नियम शिथिल करताना काही निकष तयार केले आहेत. यात   ऑक्सिजन बेडच्या उपलब्धतेचे प्रमाण 40 टक्के पाहिजे. कोल्हापुरात हे प्रमाण 29 टक्के आहे. दररोज खासगी व शासकीय प्रयोगशाळेत कोरोनाच्या तपासणी व बाधितांचे प्रमाण हे दहा टक्यांच्या आत असते तर तिसर्‍या टप्प्यात कोल्हापूरचा समावेश झाला असता. पण कोल्हापूर जिल्ह्यात 5 जून रोजी पॉझिटिव्हिटी  प्रमाण 17.10  टक्के होते.

Back to top button