एव्हरेस्ट मोहिमेने अनेक गोष्टी शिकविल्या... | पुढारी

एव्हरेस्ट मोहिमेने अनेक गोष्टी शिकविल्या...

कोल्हापूर : सागर यादव 

सह्याद्री पर्वताच्या अंगा-खांद्यावर खेळल्यानंतर हिमालयातील एव्हरेस्ट मोहीम सर करण्याचा प्रयत्न यथाशक्ती केला; पण प्रतिकूल हवामानामुळे निसर्गासमोर नतमस्तक होऊन मोहीम अंतिम टप्प्यात थांबवावी लागली. यामुळे जगातील सर्वोच्च माऊंट एव्हरेस्ट (29 हजार 29 फूट) शिखरावर भारताचा तिरंगा आणि महाराष्ट्राचा भगवा ध्वज अभिमानाने फडकविण्याचे माझे स्वप्न अपुरे राहिले, अशा आठवणी व अनुभव करवीर कन्या कस्तुरी सावेकर हिने सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केल्या. 

दरम्यान, एक नवोदित गिर्यारोहक म्हणून एव्हरेस्ट मोहिमेतून मला खूप काही शिकायला मिळाले. एका सोप्या समीटपेक्षा एका खडतर आरोहणात स्वतःला आजमावण्याची संधी मला या मोहिमेने प्राप्त करून दिली. याचा मला माझ्या पुढील गिर्यारोहण करिअरमध्ये नक्कीच फायदा होईल, असे कस्तुरीने सांगितले आहे.    

चक्रीवादळामुळे वातावरण बिघडले

21 मेच्या रात्री 10.30 वा. बेसकॅम्पपासून चढाईस सुरुवात केली. पहाटे 5 च्या सुमारास कॅम्प, तर सकाळी 11 वाजता कॅम्प दोन गाठला. येथे मुक्काम करून आमची टीम कॅम्प तीनच्या दिशेने निघाली; पण पुढे जे घडणार होते त्याची पुसटशीही कल्पना आम्हाला नव्हती. कॅम्प तीनच्या दिशेने 2 तासांची चढाई केल्यानंतर चक्रीवादळामुळे वातावरण बिघडले. 

अचानक जोराचे वारे (wind gusts) सुरू झाले. वार्‍याचा जोर हळूहळू वाढला. या हवेपासून बचाव करणारे विशिष्ट गॉगल, डाऊनसूटचे हुड व्यवस्थित लावूनही बर्फाचा मारा सुया टोचल्यासारखा सुरू होता. यामुळे कॅम्प तीनच्या शेवटच्या टप्प्यातील ही चढाई फारच अवघड झाली होती. अशा अवस्थेतच कॅम्पला पोहोचून टेंट ठीक केला. आमच्या टीममध्ये 11 क्लायम्बर व 11 शेर्पा होते.

पाच दिवसांनंतर परतीचा निर्णय

पुढचे तीन दिवस हिमवृष्टी आणि जोरदार वारा सुरूच राहिला. कॅम्प दोनवर 5 फूट बर्फ साठला. या बर्फातून चालणे अतिशय अवघड झाले होते. यामुळे खालून ना हेलिकॉप्टर, ना शेर्पा रसद घेऊन येऊ शकले. यामुळे अन्न-पाणी मिळणे अवघड झाले. अन्नपाण्याविना मोहीम चालू ठेवण्यात शहाणपणा नव्हता, म्हणून कॅम्प तीनवर 2 रात्री आणि कॅम्प दोनवर 3 रात्री असे 5 दिवस अतिशय खडतर पद्धतीने काढून आम्ही बेसकॅम्पला परतलो. खुंबू पार करायला जिथे 4 तास लागतात तिथे 8 तास लागले. एव्हरेस्टचे शिखर सर करण्यास अवघ्या दहा तासांची चढाई शिल्लक राहिली असताना खराब वातावरणामुळे परतीचा प्रवास करावा लागल्याचे कस्तुरीने म्हटले आहे. 

गॅस, रेशन संपल्याने परिस्थिती बिकट

तिसर्‍या दिवसापर्यंत हवेचा जोर कमी झाला नव्हता. कॅम्प तीनवरील ईपी गॅस, रेशन सगळे संपल्याने खाली जाण्याशिवाय पर्याय उरला नव्हता. यामुळे निर्णय घेऊन कॅम्प दोनला जाऊन चांगल्या हवामानाची वाट पाहायची आणि परत वर यायचा निर्णय घेतला. बेसकॅम्पवरून ही रसद येईल आणि आम्ही चढाई करू, अशी आशा होती; पण हा गैरसमज ठरला.

Back to top button