RTE प्रवेश प्रक्रियेला शुक्रवारपासून प्रारंभ! | पुढारी

RTE प्रवेश प्रक्रियेला शुक्रवारपासून प्रारंभ!

पुणे : पुढारी वृत्तसेवा

आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरू होण्याची प्रतीक्षा अखेर संपली आहे. यंदाची आरटीई प्रवेश प्रक्रिया येत्या शुक्रवार दि.11 पासून सुरू करण्यात येणार आहे. पालकांना आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी 20 दिवसांचा कालावधी देण्यात येणार आहे. अशी माहिती प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक दत्तात्रय जगताप यांनी दिली आहे.

बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत राबविण्यात येणार्‍या आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी 7 एप्रील रोजी लॉटरी जाहीर करण्यात आली होती.परंतु कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे पुढील प्रक्रिया सुरू करण्यात आली नव्हती. आता कोरोनाचा प्रादूर्भाव कमी होत असल्यामुळे प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शुक्रवारपासून शाळांनी पालकांना प्रवेशासाठी पोर्टलवर दिनांक द्यावेत.आणि आरटीई 25 टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची कार्यवाही सुरू करावी. आरटीई 25 टक्के ऑनलाईन प्रवेश सुरू झाले आहेत. अशा सूचना शाळेच्या प्रवेशव्दारावर लावाव्यात. ज्या बालकांना लॉटरी लागली आहे. त्यांच्या पालकांनी मूळ कागदपत्रे व छायांकित प्रती घेवून शाळेत जाऊन आपल्या पाल्याचा तात्पूरता प्रवेश निश्चित करावा. कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव व लॉकडाऊन या कारणांमुळे जे पालक प्रत्यक्षरित्या शाळेत प्रवेशासाठी येवू शकत नाहीत. अशा बालकांच्या पालकांनी दिलेल्या मुदतीत दूरध्वनीव्दारे, ई-मेलव्दारे, व्हॉटस्अ‍ॅपव्दारे शाळेत संपर्क करून प्रवेशाची कार्यवाही पूर्ण करणे गरजेचे आहे. निवड यादीतील विद्यार्थ्यांचा प्रवेश घेण्याचा कालावधी संपल्यानंतर  शाळांमधील रिक्त जागांवर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. राज्यात प्रत्यके जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादूर्भाव लक्षात घेवून प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याबाबत निर्णय घ्यावा असे स्पष्ट आदेश देखील विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी यांना जगताप यांनी दिले आहेत.

Back to top button