पुणे : अहो, पोलिस कमिशनर..., तुमचे पोलिस काय करताहेत, बघा... | पुढारी

पुणे : अहो, पोलिस कमिशनर..., तुमचे पोलिस काय करताहेत, बघा...

पुणे; पुढारी वृत्तसेवा : ”अहो पोलिस कमिशनर…, हे पाहा. आम्ही पोलिसांच्या चांगल्या कामाचं एका बाजूनं कौतुक करतोय अन दुसरीकडं तुमचे पोलिस काय करताहेत?” संतापलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधान भवनाच्या आवारात मोठ्याने हाक मारली. जरा दूरवर असलेले पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता जवळपास धावतच पवार यांच्याकडे आले. पवार विधान भवनाच्या आवारातून बैठकीसाठी आत जात होते. 

त्यांच्याभोवती असलेल्या गर्दीतून आणि काळे गणवेश घातलेल्या सुरक्षा रक्षकांच्या कडक बंदोबस्तातून मोठ्या मुष्किलीने वाट काढत एक तरूणी त्यांच्यापऱ्यंत पोचली. ”साहेब, मला एक तक्रार तुमच्याकडं करायचीये…”पवार थबकले आणि ती संधी साधत त्या तरूणीने आपल्या हातातील निवेदन त्यांच्या हाती ठेवले. पवार त्या निवेदनावर नजर फिरवत असतानाच त्या तरूणीच्या तोंडून बाहेर पडत असलेली तिची व्यथा ऐकू लागले. ”साहेब, माझा नवरा आणि सासरे दोघंही पोलिस आहेत, पण मला माहेराहून पैसे आणायचा दबाव आणताहेत, मला मारहाण करताहेत. मी आता सासरी राहात नाही. मला ही लहान मुलगी आहे हो…”

त्या तरूणीचे बोट धरलेली एक चिमुकली मुलगी आपल्या निष्पाप डोळ्यांनी पवार यांच्याकडे पाहात होती. तिच्याकडे कटाक्ष टाकत पवारांनी पोलिस आयुक्तांनाच खड्या आवाजात हाक मारली. गुप्ता यांनी ते निवेदन आपल्या हातात घेतले अन ”मी चौकशी करतो साहेब,” असे नम्रपणाने सांगितले.

”चौकशी करा, त्याला चांगला दम द्या, असं चालणार नाही म्हणावं त्याला.” मग त्या तरूणीकडे वळून पवार म्हणाले, ”तू काय शिकली आहेस ?” ”मी बी. कॉम. झालीये, साहेब.” ”ठीक आहे, पाहातो” असे म्हणून पवार विधान भवनात निघून गेले आणि इकडे पोलिस आयुक्त कामाला लागले. त्यांनी चौकशी केली आणि सूत्रे हालली जाऊन पोलिस नाईक असलेल्या पतीसह सासरच्यांवर चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात कौटुंबिक हिंसाचार, मारहाण तसेच धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

त्या तरूणीचा पती पोलिस नाईक योगेश पुरूषोत्तम सवाने (32), सासरे पुरूषोत्तम भिमराव सवाने (69), सासू आशा पुरूषोत्तम सवाने (60), दीर प्रसाद पुरूषोत्तम सवाने (29), नणंद योगिता रत्नाकर बनसोडे (30, रा. सर्व रा. आउंडे, लोणावळा, ता. मावळ जि. पुणे) आणि दादा भिमराव सवाने (60, रा. तळेगाव) यांच्यावर कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तपास अधिकारी उपनिरीक्षक सुप्रिया पंधरकर यांनी सांगितले की फिर्यादी आणि आरोपी योगेश सवाने यांचा 2006 मध्ये प्रेम विवाह झाला होता. योगेश पुणे ग्रामीण पोलिस दलात पोलिस नाईक पदावर कार्यरत आहे. फिर्यादी सासरी नांदत असताना आरोपींनी संगणमत करून तिला माहेरहून पैसे आणण्याचा तगादा लावून, पैसे न घेऊन आल्याच्या कारणावरून तिच्या चारित्र्यावर संशय घेत होते. तिला सतत शिवीगाळ करून मारहाण करत होते. 

माहेरहून पैसे न आणल्याने आरोपींना तिला व तिच्या मुलीला जीवे मारण्याची धमकी दिली होती. तसेच फिर्यादीच्या आईच्या नावावर असणारा खडकवासला येथील प्लॉट भुलथापा देऊन 30 मार्च 2019 रोजी पती योगेशने स्वतःच्या नावावर करून घेतला. तसेच बालेवाडी येथे फिर्यादीच्या वडीलांच्या नावावरील प्लॉटमध्ये अफरातफर करण्याच्या बेतात होता. एवढेच काय कमी होते, पती योगेशने ती सध्या राहत असलेल्या ठिकाणी जाऊन तिच्या घरच्यांना शिवीगाळ व मारहाण करून तिचे स्त्रीधन घेऊन गेला आहे. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिलेल्या निर्देशानुसार चुतुःश्रृंगी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजकुमार वाघचवरे यांनी तक्रारीची दखल घेत हा गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सुप्रिया पंधरकर करत आहेत.

Back to top button