शरद पवार खरंच मोदींविरोधी उभे राहतील? | पुढारी

शरद पवार खरंच मोदींविरोधी उभे राहतील?

बाळासाहेब पाटील; पुढारी  ऑनलाईन : कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत भारतात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाल्याने आपल्या प्रतिमेच्या बाबतीत प्रचंड दक्ष असणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी बॅकफूटवर आहेत. या पार्श्वभूमीवर देशभरात विविध प्रादेशिक पक्षांनी आपल्या परीने मोदींविरोधाला धार आणली आहे. २०२४ च्या निवडणुकांना अवधी असला तरी ती ताकद भाजपपुढे पुरेशी नसल्याची सर्वांना जाणीव आहे. हीच मोट बांधण्याच्या हालचाली आता राष्ट्रीय पातळीवर सुरू झाल्या आहेत. त्याचेच निदर्शक म्हणजे शरद पवार आणि राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांची भेट होय.

वाचा : तोरणा गडावर खरंच सापडला होता मोहरांचा हंडा? 

प्रशांत किशोर आणि शरद पवार यांची भेट ही राजकीय वर्तुळात महत्त्वाची नोंद असली आणि राष्ट्रवादी कितीही नाकारत असले तरी पवार यांनी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली यात दुमत नाही. प्रशांत किशोर यांच्यामुळे राष्ट्रीय राजकारणात यश मिळाले. २०१४ च्या निवडणुकीत मोदी यांच्या निवडणुकीची रणनीती आखली होती. मात्र, त्यानंतर भाजपपासून दुरावलेल्या किशोर यांनी प्रादेशिक पक्षांशी संपर्क साधत जमेल तिथे मोदीविरोध प्रकट केला. 

बिहारमध्ये नितीश कुमार यांना फायदा

बिहारमध्ये जनता दल युनायटेड आणि राष्ट्रीय जनता दलाच्या आघाडीमागे प्रशांत किशोर यांची भूमिका महत्त्वाची होती. जेडीयूमध्ये प्रशांत किशोर काही काळ सहभागी झाले होते. त्याचा फायदा नितीशकुमार यांना झाला. नितीश कुमार आणि लालूप्रसाद यादव हे कट्टर राजकीय विरोधक एकत्र आल्याने भाजपला रोखण्यात यश आले होते. सत्तेत आल्यानंतर नितीशकुमार यांनी लालूप्रसाद यादवांना बाहेरचा रस्ता दाखवला आणि भाजपसोबत सत्ता स्थापन केली. भाजपसोबत गेल्यानंतर आपसूक प्रशांत किशोर यांनाही कात्रजचा घाट दाखवला. सीएए कायद्यावरून नितीशकुमार आणि किशोर यांच्यात मतभेद झाले असले तरी भाजपशी मतभेद असलेल्या किशोर यांना पक्षात ठेवणे अडचणीचे होते. 

वाचा : नारायण राणेंच्या मंत्रिपदाची जोरदार चर्चा, राणेंना मंत्रीपद देणे भाजपला का महत्त्वाचे वाटते?

पश्चिम बंगालमध्ये भाजपला रोखले 

प्रशांत किशोर यांनी नुकत्याच झालेल्या पश्चिम बंगाल निवडणुकीत ममता बॅनर्जी यांना मदत केली. रणनीतीकार म्हणून त्यांच्या कंपनीने जरी पक्षाला सल्ला दिला असला तरी मोदीविरोधी हीच यामागची प्रमुख भूमिका आहे. भाजपने ज्या पद्धतीने पश्चिम बंगालमध्ये तयारी केली ती पाहता भाजप सत्ता हस्तगत करेल असा अंदाज वर्तविला जात होता मात्र, तृणमूल काँग्रेसने भाजपला रोखत आपल्या जागा वाढविल्या. त्यामुळे जिथे प्रशांत किशोर तेथे सत्ता हे गणित आता अधोरेखित झाले आहे. 

प्रशांत किशोर यांच्या भेटीगाठी 

पश्चिम बंगालमध्ये निकाल लागल्यानंतर प्रशांत किशोर यांनी उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांची भेट घेतली. यासाठी ममता बॅनर्जी यांनी पुढाकार घेतला आहे. आठ महिन्यांत उत्तर प्रदेशात निवडणुका होणार असून सध्या कोरोनामुळे योगी आदित्यनाथ सध्या बॅकफूटवर आहेत. शिवाय तेथे एकाधिकारशाहीचा आरोपही होत आहे. त्यामुळे नेतृत्वबदलाच्या हालचाली होत्या. मात्र, तुर्तास तो टळला आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशातील पूरक वातावरणाचा फायदा घेण्याच्या हालचाली सुरू आहेत. 

काँग्रेस निष्प्रभ 

सध्या देशात  राजस्थानमध्ये अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे सरकार आहे.  येथे वसुंधराराजे यांच्या नेतृत्वाखालचा विरोधी पक्ष निष्प्रभ आहे. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपला यश मिळाले आहे. काँग्रेसमध्ये अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यात मतभेद आहेत. अजूनही ते मिटलेले नाहीत. दिल्लीसारख्या राज्यात काँग्रेसने अजूनही काम सुरू केलेले नाही. आसाममध्ये संधी असूनही मागील निवडणुकीत काहीच तयारी केली नाही. केरळसारख्या राज्यात जागा वाढविण्याची संधी असतानाही तेथे पुरेसा प्रचार केला नाही. उत्तर प्रदेशात अजूनही प्रियांका गांधी की राहुल गांधी यांना पुढे करायचे असा संभ्रम आहे. पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग आणि नवज्योत सिद्धू यांच्यातील मतभेद मिटविण्यास अजूनही पक्ष पुढाकार घेत नाही. महाराष्ट्रात सत्ता असूनही पक्षाचे नेते केवळ पारंपरिक मुद्द्यांना चिकटून बसले आहेत. निडणुका लढण्याबाबत रोज एक मत व्यक्त करून गोंधळ उडवून देत आहेत. एकूण पाहता पक्षीय पातळीवर काँग्रेस पूर्ण निष्प्रभ ठरूनही यूपीएचे नेतृत्व काँग्रेसबाहेर किंबहुना गांधी घराण्याबाहेर दिले जात नाही. भविष्यातही तसा अंदाजही नाही. त्यामुळे २०२४ मध्ये भाजपला टक्कर देणारा राष्ट्रीय पक्ष कोण असा प्रश्न सध्या तरी अनुत्तरित आहे. 

वाचा : गौतम अदानींचे आशियातील श्रीमंतांच्या यादीतील दुसरे स्थान घसरणार?

प्रादेशिक पक्षांची मोट 

यूपीएचा अध्यक्ष काँग्रेसबाहेरील आणि गांधी घराण्याला वगळून करणे काँग्रेसच्या पचणी पडणे शक्य नाही. मध्यंतरी संजय राऊत यांनी शरद पवार यांनी यूपीएचे नेतृत्व कराव असे वक्तव्य केल्यानंतर त्याचे राजकीय वर्तृळात पडसाद उमटले. सर्व चाचपणी केल्यानंतर २०२४ मध्ये भाजपला एकास एक उत्तर देण्यास सर्वांनाच अपयश येईल असे दिसते. मात्र, सर्व प्रादेशिक पक्षांनी आपली बाजू भक्कम करायची. निवडणुका झाल्यानंतर सर्वांनी एकत्र येऊन पर्याय द्यायचा असा प्रयोग होऊ शकतो. सध्या बंगालमध्ये तृणमूलचा पाया भक्कम आहे. हरियाणामध्ये भाजप आणि जननायक जनता पार्टीची संयुक्त सत्ता आहे. येथे काँग्रेसची ताकद आहे. पंजाबमध्ये काँग्रेसची सत्ता असली तरी तेथे पक्षांतर्गत मतभेद जास्त आहेत. गुजरातमधील काँग्रेसची ताकद वाढली असून कोरोना काळात हाहाकार उडाल्याने भाजप सध्या बॅकफूटवर आहे. कर्नाटकातही काँग्रेस, धर्मनिरपेक्ष जनता दल आणि भाजपमध्ये काटे की टक्कर आहे. मध्य प्रदेश, गोवा या राज्यांत काँग्रेसची ताकद असली तरी तेथे भाजपचे सरकार आहे. येथे अमित शहा यांनी आपल्या कौशल्याने सरकार आणले आहे. जम्मू काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लावली असून येथे आगामी काळात भाजपला झटका बसण्याची शक्यता आहे. आंध्र प्रदेशमध्ये जगनमोहन रेड्डी हे भाजविरोधात ठोस भूमिका घेत नाहीत. तर छत्तीसगढमध्ये भूपेंद्रसिंग हुडा यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस भक्कम आहे. तामिळनाडूसारख्या राज्यात एम. के. स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखाली डीएमके यांच्यासोबत काँग्रेस सत्तेत आहे. अशी सगळी विभागणी असली तरी काँग्रेसच्या नेतृत्वपातळीवरील गोंधळामुळे यूपीएच्या भवितव्याबाबत साशंकता आहे. 

प्रशांत किशोर यांची चॉइस पवारच का?

सध्या देशपातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान देईल अशा काही नेत्यांची यादी केली तर ती दोन तीन नेत्यांपलीकडे जात नाही. यात शरद पवार यांचे नाव वरच्या स्थानी आहे. ममता बॅनर्जी प्रखर मोदीविरोधक असल्या तरी त्यांचा प्रभाव देशव्यापी नाही. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मोदीविरोधक असले तरी ते सोयीने भूमिका घेतात. अशा वेळी देशाचा कानाकोपरा माहीत असलेले आणि सर्वपक्षीय सबंध असलेले पवार हेच मोट बांधू शकतात अशी खात्री किशोर यांना आहे. त्यामुळेच त्या पातळीवर चर्चा झाली असण्याची शक्यता आहे. 

कोण आहेत प्रशांत किशोर?

प्रशांत किशोर हे निवडणूक रणनीतीकार असून त्यांनी आतापर्यंत देशभरातल्या वेगवेगळे पक्ष आणि त्यांच्या निवडणूक प्रचार मोहिमेसाठी काम केले आहे. किशोर यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान नरेंद्र मोदींसाठी काम केले. यानंतर पंजाब आणि उत्तर प्रदेश विधानसभांच्या निवडणुकांसाठी प्रशांत किशोर यांनी राहुल गांधी यांच्यासोबत काम केले. पश्चिम बंगाल निवडणुकीत भाजपने जर १०० पेक्षा जास्त जागा जिंकल्या तर रणनीतीकार म्हणून काम सोडेन असे आव्हान दिले होते. सध्या मोदींविरोधकांसाठी काम करण्यास ते प्राधान्य देत आहेत. 

वाचा : कोल्हापूर : मराठा मूक आंदोलनात छत्रपती घराण्यातील सर्वजण सहभागी 

Back to top button