कस्तुरीचा पुन्हा एव्हरेस्ट सर करण्याचा निर्धार | पुढारी

कस्तुरीचा पुन्हा एव्हरेस्ट सर करण्याचा निर्धार

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा 

जगातील सर्वात उंच म्हणजेच 29 हजार 29 फुटांचे  एव्हरेस्ट शिखर सर करण्याचा पुन्हा प्रयत्न करण्याचा निर्धार कस्तुरी सावेकर हिने केले. एव्हरेस्ट चढाईचा पहिला अयशस्वी प्रयत्न  खूप रोमांचक आणि  मोठा अनुभव देणारा ठरला. यामुळे  माझा आत्मविश्वास द्विगुणीत झाल्याचे कोल्हापूरची युवा गिर्यारोहक कस्तुरी सावेकर हिने आवर्जून सांगितले. 

एव्हरेस्ट मोहिमेवरून परत आलेल्या कस्तुरीने गुरुवारी पत्रकारांशी संवाद साधला. सर्वप्रथम तीने एव्हरेस्ट मोहिमेसाठी पाठबळ देणार्‍या कोल्हापूरकरांचे आवर्जून आभार मानले. कस्तुरी म्हणाली, एव्हरेस्ट मोहिमेच्या पहिल्या दिवसापासून सर्व टीमला खराब हवामानाचा सामना करावा लागला. चक्रीवादळामुळे वातावरण प्रचंड बिघडल्याने तिसर्‍या कॅम्पमधून खाली यावे लागले. कॅम्प दोनवर काही दिवस थांबलो; पण तेथील रेशन आणि इंधन संपल्याने मोहीम थांबवून बेस कॅम्पला परतावे लागले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या मोहिमेतून मानसिक व शारीरिक सक्षम तयारी झाली आहे. 

ज्येष्ठ गिर्यारोहक उमेश झिरपे म्हणाले,  मोहिमेत जगभरातून 440  गिर्यारोहक सहभागी झाले होते. त्यातील केवळ 40 टक्के गिर्यारोहकच शिखरावर पोहोचण्यात यशस्वी ठरले. यंदा हवामान अधिक खराब होते. अशा प्रतिकूल स्थितीतही धाडसी कस्तुरीने चांगला प्रयत्न केला. हताश न होता तीने परत प्रयत्न करावा. यासाठी कोल्हापूरकरांनी तीला साथ द्यावी. पत्रकार परिषदेस दुर्ग अभ्यासक डॉ. अमर अडके, एव्हरेस्टवीर आशिष माने, दीपक सावेकर, संतोष कांबळे,  इंद्रजित सावेकर, अरविंद कुलकर्णी आदी उपस्थित होते.

Back to top button