शालेय शिक्षण विभागाचा गोंधळात गोंधळ | पुढारी

शालेय शिक्षण विभागाचा गोंधळात गोंधळ

सरुड : चंद्रकांत मुदूगडे

इयत्ता पहिलीतील प्रवेशासाठी शालेय (प्राथमिक) शिक्षण विभागाने विद्यार्थ्याच्या वयाची अट सहा वर्षांऐवजी थेट साडेपाच वर्ष केल्यामुळे शिक्षकांसह पालकवर्गात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. पुढील ३० सप्टेंबरला सहा वर्षे पूर्ण होणाऱ्या मुलांना  पहिलीच्या वर्गात प्रवेश दिला जात होता. यंदापासून त्यात शिथिलता देत ३१ डिसेंबरची अट घालण्यात आली आहे. प्रत्यक्षात पावणेसहा वरून साडेपाच वर्ष वयाच्या मुलांचा शाळाप्रवेश निश्चित झाल्यामुळे यंदाच्या शैक्षणिक सत्रात अपवादात्मक सगळीकडेच विद्यार्थी पटसंख्येला चढलेली सूज पुढील वर्षी स्वाभाविकपणे उतरणार आहे. मात्र या साऱ्या गोंधळात उद्भवणाऱ्या तांत्रिक समस्यांचा निपटारा कोण करणार ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.   

वाचा : …तर तो शिवसैनिक; महापौरांकडून बाळासाहेब ठाकरेंचा तो व्हिडिओ व्हायरल

राज्याच्या प्राथमिक शिक्षण विभागाने मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार (आरटीई) कायद्यानुसार बालकाचे वय ६ वर्षे पूर्ण झाल्यानंतरच इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश द्यावा, या स्वतःच्याच पूर्व आदेशाला कोलदांडा दिला आहे. कागदोपत्री ‘सहा वर्ष पूर्ण’ या शब्दाच्या आडून सातत्याने निकषात बदल केला गेल्याने साडेपाच वयाच्या बालकांना इयत्ता पहिलीत प्रवेश दिला जात आहे, प्राथमिक शाळांनी या निकषाची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे.  बऱ्याच सुजाण नागरिकांनी याला विरोध केला आहे. मानसिक आणि बौद्धिक क्षमता विकासाच्या मुद्द्यावर मुलांच्या भवितव्याशी सरकारी व्यवस्थेने उघडउघड खेळ मांडला असल्याचा आरोपही हे सुज्ञ पालक करत आहेत. 

सध्याच्या निकषानुसार साडेपाच वर्षाच्या मुलांना शाळेत प्रविष्ठ करण्यास पालकांचा विरोध होणे क्रमप्राप्त आहे. परंतु पुढील वर्षी संबंधित मुलांना (साडेसहा वर्ष पूर्ण होत असल्याने आणि आरटीई कायद्याच्या अधीन) इयत्ता पहिली ऐवजी सरळ दुसरीच्या वर्गात प्रवेश घ्यावा लागणार आहे. अशावेळी महत्त्वाची बाब म्हणजे जानेवारी महिन्यात जन्मणारे मूल पहिल्या वर्गात तर अवघे एक महिना अगोदर म्हणजेच डिसेंबर महिन्यात जन्माला येणारे मुल दुसरीच्या वर्गात प्रविष्ठ होणार आहे. कारण विहित दिनांकानुसार शालेय शिक्षण विभागाने आपल्या वेबसाईटवर वयोगट अपलोड केला आहे. दुसरीकडे निकष प्रमाण मानून (तीन महिने आधीच) मुलांचा शैक्षणिक प्रवेश झाल्याने सद्याच्या पटसंख्येत किमान २० टक्के वृद्धी झाली आहे. अशावेळी गरजेनुसार अपेक्षित शिक्षक संख्या मात्र वाढणार नाही. याशिवाय पुढील वर्षी पटसंख्या घटण्याबरोबरच शिक्षक अतिरिक्त ठरण्याची भीती व्यक्त होत आहे.

वाचा :  ‘शिवप्रसाद दिलाय, शिवभोजन थाळीची वाट पाहू नका’

मुलांच्या शैक्षणिक भविष्याचा प्रश्न?

बाल मनोवैज्ञानिकांच्या निरीक्षणानुसार शाळेच्या वेळा, अभ्यासक्रमाचा ताण आणि त्याचबरोबर वयानुरूप कौशल्य विकासाची गरज पाहता कमी वयाच्या मुलांना पहिलीत प्रवेश दिल्यामुळे त्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. मुलांची शारीरिक क्षमता, कारक क्षमता, आकलन क्षमता विकसित होणे, त्यानंतर अक्षरओळख, अंकओळख होणे अपेक्षित असते. लहान वयातच शिक्षण सुरू झाल्याने विद्यार्थ्यांच्या क्षमताविकास तसेच शैक्षणिक भविष्यात अडथळे येऊ शकतात.

वाचा : एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या घरावर छापा

Back to top button